मुंबई : मागील काही दिवसांपासून उन्हाळा अधिक तीव्रतेनं जाणवण्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यातच ही अवस्था असल्यामुळं एप्रिल, मे आणि जून महिन्याचे पंधरा दिवस नेमकी काय अवस्था असेल याचा विचार करुनही भीती वाटत आहे.
जिथं थंडीच्या दिवसांमध्ये पंख्यांचा वापर फार क्वचित होत होता, एसीचा तर विचारही केला जात नव्हता. तिथेच सध्या ही उपकरणं सातत्यानं सुरु आहेत.
आपण मस्त हवा खातोय... पण, हातात येणाऱ्या बिलाच्या चिंतेनं घरातील कर्त्या माणसाला घाम फुटत आहे. त्यातच एसी, पंखा किंवा कूलरमध्ये काही बिघाड झाल्यास दुष्काळात तेरावा महिना.
पण, तुम्हाला माहितीये का असे काही मार्ग आणि काही उपाय आहेत ज्यांचा वापर करत तुम्ही वीजबिलही घटवू शतका आणि अर्थातच या उन्हाळ्यात निवांत थंड हवेचा आस्वादही घेऊ शकता.
पंखा नीट हवा देत नसेल तर....
बऱ्याच दिवसांनी पंखा जास्त वेगानं चालू केल्यास तो नीट हवा देत नाही हे तुमच्या लक्षात आलं तर काळजी नसावी. यासाठी तुम्हाला कोणालाही बोलवायची गरज नाही.
अभ्यासकांच्या मते पंख्याच्या पात्यांची रचनाच अशी असते ज्यामुळं हवेचा प्रवाह दुभागला जातो. अशा परिस्थिती धूळ- मातीच्या कणांमुळं पंख्याच्या पातीची धारदार बाजू बोथट होते.
ज्यामुळं पंख्याची क्षमता घटते आणि त्याचा वेग कमी होतो. पंख्याची मोटर जास्त वीज खर्ची घालण्याचं काम करते आणि याचे परिणाम वाढलेल्या वीज बिलात दिसतात.
नेमकं काय करावं?
पंख्यांचे पाते सातत्यानं ओल्या कपड्यानं स्वच्छ करा. स्वच्छ करताना पात्यावर जास्त जोर देऊ नका, कारण त्याची आखणी बिघडू शकते. अगदी सावकाश पाते स्वच्छ करा. हाच नियम एसी आणि कूलरलाही लागू आहे.
पंखा स्वच्छ झाल्यानंतर तुम्ही स्वत:च त्याचा वेग आणि त्यामध्ये झालेले बदल अनुभवू शकता. मुख्य म्हणजे वीजबिलाच्या आकड्यांमध्ये दिसणारे बदल तुम्हाला जास्त सुखावणारे असतील यात शंका नाही.