मध्य प्रदेशात ७४ टक्के, मिझोराममध्ये विक्रमी मतदानाची नोंद

मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर काँग्रेसच्या आशा आणखी उंचावल्या आहेत.

Updated: Nov 28, 2018, 10:07 PM IST
मध्य प्रदेशात ७४ टक्के, मिझोराममध्ये विक्रमी मतदानाची नोंद title=

नवी दिल्ली: भाजप आणि काँग्रेसमधील चुरशीमुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या मध्य प्रदेशात बुधवारी मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार येथे ७४.६१ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. यानंतर काँग्रेस नेते कमल नाथ यांनी आम्ही मोठा चमत्कार घडवू, असा आशावाद व्यक्त केला. यापूर्वी कमल नाथ यांनी काँग्रेसला राज्यात साधारण १४० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर काँग्रेसच्या आशा आणखी उंचावल्या आहेत. आज राज्यात दोन गोष्टी शांतपणे संपुष्टात आल्या. एक म्हणजे निवडणूक आणि दुसरी म्हणजे भाजपची सत्ता, असे कमल नाथ यांनी म्हटले. 

यंदाच्या निवडणुकीत भाजपला अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टरचा फटका बसू शकतो. याचा लाभ काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. २३० पैकी २२७ मतदारसंघात सकाळी आठ ते दुपारी पाच या वेळेत मतदान पार पडले. तर उर्वरित तीन नक्षलग्रस्त मतदारसंघांमध्ये सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत मतदान पार पडले. 

तर दुसरीकडे मिझोराममध्ये ७५ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली. विधानसभेच्या ४० जागा असलेले मिझोराम हे ईशान्येतील काँग्रेसच्या ताब्यातील अखेरचे राज्य आहे. त्यामुळे काँग्रेस मिझोरामची सत्ता राखणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मिझोरामधील ७,७०, ३९५ मतदारांमध्ये महिलांचे प्रमाण ३,९४, ८९७ इतके होते. या ठिकाणी एकूण २०९ उमेदवार रिंगणात होते. यापैकी १५ महिला उमेदवार होत्या. ११ डिसेंबरला या दोन्ही राज्यांतील मतदानाचा निकाल जाहीर होईल.