नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019च्या निवडणुकीवर निवडणूक आयोगाने बारीक नजर ठेवली आहे. निवडणूक आदर्श आचरसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. 48 ते 72 तास भाषणावर आणि निवडणुकीत सहभाग घेण्यावर बंदी घातली आहे. आता तर बायोपिकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वेब सीरिजला बंदी आणली आहे. ऑनलाइन स्ट्रीमिंग थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे हा भाजपला मोठा झटका आहे.
नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्यानंतर आता निवडणूक आयोगाने मोदींवरील वेब सीरिजवरही आक्षेप घेत थेट बंदीची कारवाई केली आहे. ‘मोदी- जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ या वेब सीरिजचे ऑनलाइन स्ट्रिमिंग थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने इरॉस नाऊ या डिजीटल प्लॅटफॉर्मला दिले आहेत. ही सीरिज ३ एप्रिल रोजी प्रदर्शित झाली होती. सीरिजच्या एकूण १० पैकी ५ भाग प्रदर्शित करण्यात आले होते.
दरम्यान, ऑनलाइन स्ट्रीमिंग होणारे सर्व एपिसोड पुढील आदेशापर्यंत काढून टाकण्यास निवडणूक आयोगाने सांगितले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकांमध्ये सर्व पक्षांना समान संधी मिळायला हवी. निवडणुकीच्या काळात एखाद्या राजकीय नेत्याच्या आयुष्यावर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर चरित्रपट प्रदर्शित होता कामा नये, असे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे.
१२व्या वर्षांपासून मोदींचे आयुष्य ते भारताचे पंतप्रधान बनण्याचा त्यांचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन उमेश शुक्ला यांनी केले आहे. तर लेखन मिहीर भुटा आणि राधिका आनंद यांचे आहे. फैजल खान, आशिष शर्मा आणि महेश ठाकूर यांनी मोदींच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील भूमिका साकारल्यात.