राजधानी दिल्लीत एका मद्यधुंद चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत एका महिलेला ठार केलं असून, 15 जणांना जखमी केलं आहे. दारुच्या नशेत असतानाही टॅक्सी चालक ड्रायव्हर सीटवर बसला होता. बेदरकारपणे चालवत त्याने टॅक्सी मार्केटमध्ये घुसवली. यावेळी मार्केटमध्ये लोकांची गर्दी होती. टॅक्सी जवळपास 15 लोकांच्या अंगावरुन गेली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर लोकांनी या चालकाला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं.
गाजिपूरच्या बुध बाजारमध्ये हा प्रकार घडला आहे. टॅक्सी चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका 22 वर्षीय तरुणीने जीव गमावला आहे. तिची ओळख पटली असून सीता देवी असं नाव आहे. दरम्यान ज्या 15 लोकांच्या अंगावरुन गाडी गेली त्यातील 7 जण गंभीर जखमी आहेत. या सर्वांना लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.
अपघातात सरिता नावाची एक महिलाही जखमी झाली आहे. तिच्या चेहऱ्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिने सांगितलं की, "मी माझ्या मुलीसह खरेदी करत असताना गाडीने धडक दिली. जेव्हा अपघात झाला तेव्हा मार्केटमध्ये फार गर्दी होती. कार मागून आली आणि धडक दिली. माझ्या मुलीच्या पाठीला आणि हाताला दुखापत झाली आहे".
ही टॅक्सी मयूर विहार फेज 3 च्या दिशेने जात होती. यावेळी चालक दारुच्या नशेत होता. याचदरम्यान रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास त्याने टॅक्सी गर्दीने भरलेल्या बुध बाजार परिसरात घातली.
ही दुर्घटना बाजारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानंतर ती बाजारात घुसताना दिसत आहे. आधी ती एका व्यक्तीला आणि हातगाडीला ठोकते. नंतर सर्व दुकानांना धडक देत पुढे जाते. यामुळे संतापलेले सर्व लोक तिथे जमा होतात आणि कारची काच फोडतात. यावेळी चालक कार माग घेतो आणि तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो.
Angry mob vandalised a car that hit seven persons including a woman who died in the hospital in #Delhi's #Ghazipur today night. Police later managed to control the crowd. pic.twitter.com/WBN4IO9oUZ
— Alok Arjun Singh (@AlokReporter) March 13, 2024
दरम्यान दुसऱ्या सीसीटीव्हीत कार अत्यंत वेगाने जात असून लोक पळत तिचा पाठलाग करताना दिसत आहे. अखेर लोक ही कार पकडतात आणि तिची तोडफोड करतात. दुसऱ्या एका व्हिडीओत जमाव कारची नासधूस करत तिला पलटी करताना दिसत आहेत.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असताना स्थानिकांनी त्यांना घेरलं आणि रस्ता अडवला. यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला.