'तू आत जाऊ शकत नाहीस,' दारुच्या नशेत आलेल्या विद्यार्थ्याला सुरक्षारक्षकाने रोखलं; अन् पुढच्याच क्षणी चाकूने...

पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. विद्यार्थी मद्यावस्थेत होता की नाही हे तपासण्याठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jul 4, 2024, 03:35 PM IST
'तू आत जाऊ शकत नाहीस,' दारुच्या नशेत आलेल्या विद्यार्थ्याला सुरक्षारक्षकाने रोखलं; अन् पुढच्याच क्षणी चाकूने... title=

बंगळुरुत एका विद्यार्थ्याने सुरक्षारक्षकाला चाकूने भोसकून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी दारुच्या नशेत कॉलेजमध्ये पोहोचला होता. यादरम्यान कॉलेज फेस्टिव्हल सुरु होता. दारुच्या नशेत असल्याने सुरक्षारक्षकाने विद्यार्थ्याला गेटवरच रोखलं. यामुळे संतापाच्या भरात विद्यार्थ्याने सुरक्षारक्षकाला चाकूने भोसकलं. 

कार्यक्रम सुरू असताना जय किशोर रॉय अमृतहल्ली येथील सिंधी कॉलेजच्या गेटवर ड्युटीवर होते. यावेळी भार्गव हा विद्यार्थी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कॉलेजमध्ये आला. यावेळी तो दारूच्या नशेत होता. जय किशोर रॉय यांनी भार्गवला कॉलेजच्या आत जाण्यापासून रोखलं. यामुळे कॉलेजच्या गेटवरच त्यांच्यात मोठा वाद झाला. वाद सुरु असतानाच भार्गवने आपल्याकडील चाकू बाहेर काढला आणि जय किशोर रॉय यांना भोसकलं. चाकू जय किशोर ऱॉय यांच्या छातीला लागला. 

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यात दिसत आहे त्यानुसार सुरक्षारक्षकाने विद्यार्थ्याला पूर्णपणे अडवण्याचा प्रयत्न केला. पण चाकू लागल्यानंतर तो खाली कोसळला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तो मूळचा बिहारचा होता. 

भार्गव अल्पवयीन नसल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी तो अल्पवयीन नाही याला दुजोरा दिला आहे. दरम्यान भार्गव दारुच्या नशेत होता हे तपासण्यासाठी पोलिसांनी रक्ताचे नमुने घेतले आहेत.