Lok Sabha : संसदेचे हिवाळी अधिवेशन (parliament winter season) सध्या सुरुय. यावेळी देशभरातील विविध मुद्द्यांवर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरु असतात. विरोधकांकडून संसदेत सत्ताधाऱ्यांवर सातत्याने जोरदार टीका करण्यात येते. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सरकार विरोधकांच्या प्रत्युत्तर देत आहे. विरोधकांकडून यावेळी सरकारला घेरण्यासाठी रणनिती आखली जातीय. संसदेत योग्य प्रकारे चर्चा होण्यासाठी लोकसभेच्या सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) हे सातत्याने प्रयत्न करत असतात. कडक शिस्तीचे असलेले ओम बिर्ला हे कायमच दोन्ही बाजूच्या सदस्यांना चुकीच्या कृतीवरुन नेहमीच झापत आलेत. असाच काही प्रसंग या अधिवेशनातही पाहायला मिळतायत.
सोनिया गांधी यांना इशारा
बुधवारी कॉंग्रसेच्या माजी अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पक्षाच्या सहकाऱ्यांशी चर्चा करण्यावरुन अध्यक्ष ओम बिर्ला यांनी इशारा दिला. लोकसभेच्या सभागृहात सोनिया गांधी यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी अधीर रंजन चौधरी आणि गौरव गोगोई यांच्यासोबत संवाद साधण्यास सुरुवात केली. यावर ओम बिर्ला यांनी इथं मिटींग करु नका असा इशारा दिला.
संसदेच्या बाहेर मिटींग करा
तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी कॉंग्रेस नेत्यांची होती. याबाबत ते एकमेकांसोबत बोलत होते. ओम बिर्ला यांनी त्यावेळी कॉंग्रेस नेत्यांना रोखलं आणि कृपया इथं मिटींग करु नका, असा इशारा दिला. बिर्ला यांनी इशारा दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी हसून यांनी काही तरी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याआधीच ओम बिर्ला यांनी, मिटींग करणं तुमचा अधिकार आहे पण तो इथं नाही संसदेच्या बाहेर असे म्हटले.
राष्ट्रवादीच्या वरिष्ठ खासदारालाही सुनावले
राष्ट्रवादीचे जेष्ठ खासदार श्रीनिवास पाटील यांना ओम बिर्ला यांनी इशारा दिला होता. प्रश्नोतराच्या काळादरम्यान, श्रीनिवास पाटील यांनी बसून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ओम बिर्ला यांनी श्रीनिवास पाटील यांना रोखलं आणि वरिष्ठ खासदार असूनही बसून बोलणे तुम्हाला शोभत नाही, असे म्हटलं.