डिब्रूगढ रेल्वे अपघातः रूळांवरुन आठ डब्बे घसरले, 3 ठार; लोकोपायलटने केला मोठा दावा

Dibrugarh Train Accident: चंदीगढ-डिब्रुगढ रेल्वे अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 30 गंभीर जखमी आहेत.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 19, 2024, 07:07 AM IST
डिब्रूगढ रेल्वे अपघातः रूळांवरुन आठ डब्बे घसरले, 3 ठार; लोकोपायलटने केला मोठा दावा  title=
Dibrugarh Express Train Accident 3 died and 30 injured

Dibrugarh Train Accident: उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात गुरुवारी चंदीगढहून डिब्रुगढला जाणाऱ्या एका एक्स्प्रेसचे 8 डब्बे रुळांवर घसरले आहेत. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. 18 जुलै रोजी हा अपघात घडला आहे. 

गोंडा येथील जिल्हाधिकारी नेहा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या 3 झाली आहे. तर, जखमी झालेल्या रुग्णांची संख्या 30 पर्यंत झाली आहे. या दुर्घटनेनंतर काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत तर, काही ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले आहेत. ही दुर्घटना उत्तर प्रदेशच्या गोंडा-गोरखपुर रेल खंड येथे मोतीगंज आणि झिलाही रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. येथे चंदिगड-डिब्रुगढ एक्स्प्रेसचे आठ डब्बे रूळांवरुन घसरले आहेत. प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, अपघात इतका भयंकर होता की यात जबर जखमी झालेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांचे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले आहे तसंच, रेल्वे रूळांवरील मलबादेखील हटवण्यात आला आहे. या अपघातामुळं त्या मार्गावर चालणाऱ्या 13 ट्रेनला फटका बसला आहे. यातील 2 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत तर 11 ट्रेनचा मार्ग वळवण्यात आला आहे. 

30 जण जखमी

आयुक्त जी. एस. नवीन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना किरकोळ जखमा आल्या आहेत. त्यातील 5 गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यातील 25 जणांना मनकापूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले आहे. काजीदेवर आरोग्य केंद्रात गंभीररित्या जखमी झालेल्या लोकांना दाखल केले आहे. तर, 3 जणांवर उपचार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघातापूर्वी मोठा आवाज

गोंडा-ढिब्रुगढ रेल्वे अपघातानंतर लोको पायलटने एक मोठा दावा केला आहे. अपघातापूर्वी स्फोटासारखा एक आवाज आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्रिभुवन असं लोको पायलटचे नाव आहे. 

प्रवाशांना मदतीचा हात

अपघातात ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा व्यक्तीच्या कुटुंबाना १० लाख रूपये, तर अति जखमींना अडीच लाख रूपये तर ज्यांना थोडी फार दुखापत झाली आहे. अशा प्रवाश्यांना ५० हजारांची मदत दिली जाणार आहे.