तुम्हाला लाज वाटायला हवी, डायनाचं मुख्यमंत्र्यांना प्रत्यूत्तर

 महाभारत काळातही इंटरनेट आणि सॅटेलाईट टेक्नोलॉजी होती, हे त्यांचं वक्तव्य चांगलंच गाजलं होतं...

Updated: Apr 28, 2018, 06:24 AM IST
तुम्हाला लाज वाटायला हवी, डायनाचं मुख्यमंत्र्यांना प्रत्यूत्तर  title=

नवी दिल्ली : माजी मिस वर्ल्ड डायना हेडन हिने त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देब यांना चांगलीच चपराक लगावलीय. मुख्यमंत्री देब यांना आपल्या वक्तव्याची लाज वाटायला हवी, या कमेंट दुखावणाऱ्या आहेत, असं डायनानं म्हटलंय. लहानपणापासून आपण गोऱ्या रंगाला दिल्या जाणाऱ्या प्राथमिकतेविरुद्ध आणि त्या मानसिकतेविरुद्ध लढा दिल्याचंही डायना हेडन हिनं म्हटलंय. 

'हे खूप दुखावणारं आहे. जेव्हा तुम्ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात सन्मानित सौंदर्य स्पर्धा जिंकता, देशाचा मान वाढवता... गव्हाळ रंगांच्या भारतीय सुंदरतेला मान मिळवून देण्यासाठी कौतुक करायचं सोडून तुम्ही त्यावर टीका करता' असंही डायना हिनं म्हटलंय.  

देब यांचं वादग्रस्त वक्तव्य

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देब पुन्हा एका वादात सापडले आहेत...त्यांनी थेट सौंर्दय स्पर्धांवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.  डायना हेडन हिला देण्यात आलेल्या 'मिस वर्ल्ड' पुरस्काराबाबत त्यांनी टीका केलीय. तिचा विजय हा फिक्स असल्याचा त्यांनी आरोप केलाय... तर ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सौंदर्यांचं कौतुक करत तिला दिलेला 'मिस वर्ल्ड'चा किताब योग्य असून तीच खऱ्या भारतीय महिलांचं प्रतिनिधीत्व करतेय, असं देब यांचं मत आहे. 

डायना हेडन 'मिस वर्ल्ड' बनली हे ठीक आहे, मात्र तिचं सौंदर्य मला कधी समजलेलं नाही, असं बिप्लव कुमार देब म्हणाले. 'ब्युटी पेजेंटस' तमाशा बनलेत असं म्हणत त्यांनी १९९७ साली डायना हेडेन हिची 'मिस वर्ल्ड'साठी झालेल्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 

आपण महिलांना देवी लक्ष्मी, सरस्वतीच्या रुपात पाहतो, ऐश्वर्या राय हीच भारतीय महिलांचं प्रतिनिधित्व करते. ती मिस वर्ल्ड बनली हे तर ठिक आहे... पण मी आत्तापर्यंत डायना हेडनचं सौंदर्य समजू शकलेलो नाही. कॉस्मेटिक माफियांची नजर भारतीय बाजारावर आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय. 

याआधी महाभारताबद्दलही त्यांनी केलेलं विधान असंच वादात सापडलं होतं. महाभारत काळातही इंटरनेट आणि सॅटेलाईट टेक्नोलॉजी होती, हे त्यांचं वक्तव्य चांगलंच गाजलं होतं... त्यामुळे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या बिप्लव देब यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ते अधिक चर्चेत असतात असंच दिसतंय.