नवी दिल्ली: नोटबंदीने देशाला काय मिळाले? हा जसा उत्सुकतेचा विषय तसाच, नोटबंदीनंतर चलनातून बाद ठरविण्यात आलेल्या सर्वाधिक नोटा कोणत्या बँकेत जामा झाल्या? हाही अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. पण, आता या प्रश्नाचे उत्तर पुढे आले आहे. नोटबंदीनंतर अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत सर्वाधिक जुन्या नोटा जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे असे की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे या बँकेच्या संचालक मंडळावर आहेत. माहिती अधिकार कायद्याखाली मागवलेल्या माहितीत ही माहिती पुढे आली आहे.
नोटबंदीनंतर सर्वाधिक जुन्या नोटा कोणत्या बँकेत जमा झाल्या, याबाबत मुंबईतील कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागवली होती. रॉय यांना उत्तरादाखल आलेल्या माहितीत अहमदाबाद जिल्हा बँकेने सर्वाधिक जुन्या नोटा जमा केल्याचे पुढे आले. रॉय यांच्या हवल्याने प्रसारमाध्यमानी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद जिल्हा बँकेत नोटाबंदीच्या काळात ७४५. ५९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या.
दरम्यान, अहमदाबाद जिल्हा बँकेचे संकेतस्थळ पाहिले असता, त्यावर अमित शाह बँकेच्या संचालक मंडळावर असल्याचे दिसते. तर, २००० सालामध्ये अमित शाह याच बँकेचे अध्यक्ष असल्याचे पुढे येते. दरम्यान, अहमदाबाद जिल्हा बँकेपाठोपाठ जुन्या नोटा जमा करण्यात राजकोट जिल्हा सहकारी बँकेचा क्रमांक लागतो. या बँकेने सुमारे ६९३ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्याची माहिती पुढे आली आहे.
८ नोव्हेंबर २०१६ हा दिवस भारताच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरला. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली. त्यानुसार हजार आणि पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. या निर्णयामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. लोकांनी पैसे बदलून घेण्यासाठी बँकांच्या दारात रांगा लावल्या. १० नोव्हेंबरपासून बँका व पोस्ट कार्यालयातून जुन्या नोटा बदलून नवीन देण्यात येत होत्या. पण, नोटबंतीच्या निर्णयानंतर पाच दिवसांनी अचानक सरकारने नियम बदलला आणि देशभरातील जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली. पण, या पाच दिवसांच्या कालावधीत जिल्हा बँकांकडे जुन्या नोटांची मोठी रक्कम जमा झाली होती. या काळात (५ दिवस) जमा झालेल्या नोटा सरकारकडून बदलून देण्यात आल्या.