बसमध्ये अश्लील चाळे करणाऱ्याची माहिती द्या आणि मिळवा २५ हजार

चालत्या बसमध्ये विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 17, 2018, 02:26 PM IST
बसमध्ये अश्लील चाळे करणाऱ्याची माहिती द्या आणि मिळवा २५ हजार title=
Image: ANI

नवी दिल्ली : चालत्या बसमध्ये विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं आहे.

दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका चालत्या बसमध्ये विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे करण्याची तक्रार दाखळ करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी संदर्भात पोलिसांना अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. त्यामुळेच पोलिसांनी बक्षीसाची घोषणा केली आहे.

७ फेब्रवारी रोजी रुट नंबर ७७४ वर धावणाऱ्या एका बसमध्ये ४०-४५ वयाच्या एका व्यक्तीने विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे केले होते. विद्यार्थीनी ज्या सीटवर बसली होती तिच्या बाजुच्या सीटवर आरोपी बसला होता. 

विद्यार्थीने बनवला व्हिडिओ

आरोपी अश्लील चाळे करत असल्याचा व्हिडिओही एका विद्यार्थीनीने मोबाईमध्ये बनवला होता. या व्हिडिओत आरोपीचा चेहरा कैद झाला आहे.

पोलिसांनी बनवले पोस्टर

या व्हिडिओच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपीचा फोटो काढून पोस्टर तयार केले आहेत. हे पोस्टर ठिकठिकाणी चिटकवण्यात आले असून या मार्गावर धावणाऱ्या बसेस, रिक्षा चालकांमध्येही वाटण्यात आले आहेत.

पोलिसांनी केली बक्षीसाची घोषणा

हा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करण्यात आला होता. या घटनेची पोलिसांत तक्रार केल्यानंतरही आरोपीला अद्याप पकडण्यात यश आलेलं नाहीये. त्यामुळे पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस दिलं जाणार असल्याचं घोषित केलं. आरोपीची माहिती देणाऱ्या व्यक्तीला २५ हजार रुपये बक्षीस दिलं जाणार आहे.