काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच, ज्योतिरादित्य शिंदे पायउतार

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं आहे.

Updated: Jul 7, 2019, 05:55 PM IST
काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच, ज्योतिरादित्य शिंदे पायउतार title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं आहे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या काँग्रेस महासचिवपदाचा राजीनामा दिला आहे. 'लोकांनी दिलेलं मत स्वीकारलं आहे. याची जबाबदारी म्हणून मी काँग्रेसच्या महासचिवपदाचा राजीनामा राहुल गांधींकडे दिला आहे. मला ही जबाबदारी दिल्याबद्दल आणि पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे,' असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

'मी आज नाही तर ८-१० दिवसांपूर्वीच राहुल गांधींकडे राजीनामा पाठवला होता. दुसऱ्या नेत्यांना राजीनामा द्यायचे आदेश द्यायला मी नेता नाही. जेव्हा तुम्हाला पद दिलं जातं तेव्हा तुमच्यावर जबाबदारीही येते. जर तुमची कामगिरी चांगली झाली नसेल, तर ती जबाबदारी माझीही आहे. त्यामुळे मी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला,' अशी प्रतिक्रिया ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.

लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरा यांचा राजीनामा

त्याआधी आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. राहुल गांधी यांनीही लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेचच पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. तरीही ते राजीनामा देण्यावर ठाम राहिले. तसंच काहीच दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस नेत्यांना नव्या अध्यक्षाची लवकर निवड करावी, असंही सांगितलं.