Wrestlers Protest : भारतीय कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यातला वाद आता चांगलाच चिघळत चालला आहे. भारतीय कुस्तीपटूंनी (Indian Wrestler) ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांची पदावरुन हकालपट्टी करत त्यांच्या चौकशीची मागणी कुस्तीपटूंनी केली आहे. यासाठी गेले महिनाभर कुस्तीपटू आंदोलनला बसले आहेत. पण अद्यापही त्यांच्या आंदोलनाची दखल केंद्र सरकारने (Central Government) घेतली नसल्याने कुस्तीपटू आता अधिक आक्रमक झाले आहेत.
ब्रिजभूषण यांचा पलटवार
दुसरीकडे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटूंच्या आरोपांवर पुन्हा एकदा पलटवार केला आहे. 'मी काहीतरी मोठे करावे अशी देवाची इच्छा आहे' यासाठीच माझ्यावर असे आरोप लावण्यात आले आहेत. माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झाल्यास मी स्वत:ला फाशी लावून घेईन असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
'माझ्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत, त्या घटना कधी आणि कुठे घडल्या' असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. माझ्यावर आरोप करुन चार महिने झालेत. पण एकही आरोप सिद्ध झालेला नाही. आरोप सिद्ध झाले तर फासावर लटकेन असं ब्रिजभूषण यांनी म्हटलंय. कुस्तीपटू पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी गेले होते. पण हा एक केवळ इमोशनल ड्रामा आहे असा आरोप करत ब्रिजभूषण सिंह यांनी पुरावे असतील तर पोलिसांकडे द्या, कोर्ट मला फाशी देईल असं आवाहन ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
कुस्तीपटू माझ्या मुलांसारखे
कुस्तीपटूंबरोबर माझा कोणताही वाद नाही. ते सर्व माझ्या मुलासारखे आहेत. त्यांच्या यशात माझाही वाटा आहे. 10 दिवसांपूर्वीपर्यंत मला माझ्या यशाचा देव म्हटले जात होतं. माझ्या कार्यकाळात भारतीय संघ 18 व्या स्थानावर तोच संघ आता पाचव्या स्थानावर आहे. ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या 7 मेडलपैकी 5 मेडल हे आपल्या कार्यकाळात मिळाले आहेत, असं ब्रिजभूषण यांनी म्हटलं आहे.
माझ्या पाठिशी 85% हरियाणा
हरियाणातील 85 टक्के जनता ही माझ्या पाठिशी आहे. माझ्याबरोबर क्षत्रिय समाज उभा आहे. पण त्याचबरोबर ब्राम्हण, तेली, गडरिया, मुसलमान आणि जाट समाजाचाही मला पाठिंबा आहे. राज्यातील एकही जागा अशी नाही जिते मला पाठिंबा नाही. मी काहीतरी मोठे करावे अशी देवाची इच्छा असल्याचं ब्रिजभूषण यांनी सांगितलं.
सरकारला पाच दिवसांचा अल्टिमेटम
दरम्यान, ब्रिजभूषम शरण सिंह यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याने आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी आपली सर्व पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी बजरंग पूनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक आपल्या समर्थकांसह हरिद्वार इथं गेले होते. पण शेतकरी नेते नरेश टिकेत यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर कुस्तीपटूंनी पदकं विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतला. नरेश टिकैत यांनी सरकारला पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.