Delhi Hit And Run Case: 3 बहिणी, आजारी आई-वडील... IIT स्कॉलरचा मृत्यू! संघर्ष वाचून डोळे पाणवतील

Delhi Hit And Run Case : शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या अशरफने फार संघर्षानंतर आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला होता. फेब्रुवारी महिन्यात पीएचडीचा अभ्यास संपवून तो शिष्यवृत्तीच्या जोरावर पुढील अभ्यासासाठी इंग्लंडला जाणार होता.

Updated: Jan 19, 2023, 11:35 AM IST
Delhi Hit And Run Case: 3 बहिणी, आजारी आई-वडील... IIT स्कॉलरचा मृत्यू! संघर्ष वाचून डोळे पाणवतील title=
Delhi Hit And Run Case

Delhi Hit And Run Case: तीन बहिणींची जबाबदारी, वडिलांना असलेला ब्रेम हॅमरेजचा (Brain Haemorrhage) त्रास आणि आईला हृदयासंदर्भातील (Heart Issues) अडचणी एवढ्या साऱ्या गोष्टींशी दोन हात करतानाच फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडला जाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या दिल्ली आयआयटीचा विद्यार्थी असलेल्या अशरफ नवाज खानचा दुर्देवी मृत्यू झाला. दिल्ली आयआयटीमध्ये (Delhi IIT) सध्या अशरफच्या मृत्यूमुळे एकच स्मशान शांतता पसरल्याचं चित्र दिसत आहे. अशरफचा मृत्यू आणि त्याच्या प्रवासाची गोष्ट वाचून तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल.

नेमका कसा झाला अपघात

आयआयटीच्या गेट क्रमांक 1 वर मंगळवारी रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी आयआयटीमध्ये पीएचडीचं (Phd) शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना एका भरधाव वेगातील कारने धडक (road accident) दिली. या अपघातामध्ये अशरफचा मृत्यू (killed in road accident) झाला असून दुसऱ्यावर साकेतमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या तरुणाचा पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात एवढा भीषण होता ही कारचं विंड स्क्रीनही पूर्णपणे तुटलं आहे. साऊथ-वेस्ट दिल्लीचे पोलीस (Delhi Police) उपायुक्त मनोज सी. यांनी मरण पावलेल्या विद्यार्थ्याचं नाव अशरफ असं असून तो 30 वर्षांचा होता असं सांगितलं आहे. 

चालक कार सोडून पळाला

अशरफ हा मूळचा बिहारमधील सीवान जिल्ह्यातील रहिवाशी होता. अशरफचा मित्र अंकुर शुक्ला (29) हा गंभीर जखमी झाला आहे. आयायआटीमध्ये पीएचडी करणाऱ्या अशरफचं शिक्षण यंदाच्या वर्षी पूर्ण होणार होतं. मात्र त्याआधीच अशरफवर काळाने झडप घातली. या अपघाताला कारणीभूत ठरलेला कार चालक पुढील काही अंतरावर कार सोडून घटनास्थळावरुन पळून गेला. या तरुणाला नंतर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास किशनगड पोलीस स्थानकाकडून केला जात आहे.

"सर्व स्वप्नं चिरडली गेली"

अशरफच्या मित्रांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार त्याची इंग्लंडमधील एका नामवंत विद्यापीठामध्ये पोस्ट-डॉक्टोरल फेलोशिपसाठी निवड झाली होती. फेब्रुवारीमध्ये अशरफ इंग्लंडला जाणार होता. अशरफच्या मित्रांनी बुधवारी त्यांच्याबरोबरच काही वरिष्ठ सहकाऱ्यांसहीत ही निवड झाल्यानिमित्त छोटं सेलिब्रेशनही केलं होतं. अशरफचा मित्र पुष्पेंद्र कुमारने "अशरफ इंग्लंडला जाण्यासंदर्भातील तयारी करत होता. तो फारच आनंदी होता. मात्र त्याच्या मृत्यूमुळे सर्व आनंदावर पाणी फेरलं गेलं आहे," अशी प्रतिक्रिया नोंदवली. अभिषेक नावाच्या अन्य एका मित्राने अशरफ फार हुशार होता आणि त्याच्या नावावर दोन पेटंटही आहेत अशी माहिती दिली. "त्या बुधवारी कॅम्पस कॅण्टीनमध्ये आपल्या या यशानिमित्त एका छोट्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र दुर्देवाने त्याआधीच त्याचा मृत्यू झाला," असं अभिषेक म्हणाला. "त्याचं करियर सुरु होणार होता. मात्र त्याची सर्व स्वप्नं चिरडली गेली," अशी प्रतिक्रिया निकिता नावाच्या अशरफच्या मैत्रिणीने व्यक्त केली. 

अनेकदा जेवायचा नाही

अशरफने 2015 मध्ये आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला होता. त्याने आपला एमटेकचा कोर्स पूर्ण करुन पीएचडीसाठी प्रवेश घेतला होता. अशरफच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार तो अभ्यासात इतका रमायचा की अभ्यास करताना अनेकदा तो रात्रीचं जेवणही करायचा नाही.

घरी पुरवायचा पैसे

अशरफच्या नात्यातील जफीर खानने दिलेल्या माहितीनुसार तो घरामधील एकमेव कमवता व्यक्ती होता. तो आपल्या शिष्यवृत्तीमधील काही पोसे आपल्या घरी पाठवायचा. काही महिन्यांपूर्वी अशरफच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झालं होतं. त्याच्या आईला हृदयाचा त्रास आहे, असं जफीरने सांगितलं. आपल्या तीन बहिणींची जबाबदारीही अशरफवरच होती.

वडिलांचं स्वप्न अपूर्ण

अशरफचे वडील शेतकरी आहेत. मुलाला आयआयटीमध्ये पाठवण्यासाठी त्यांनी फार मेहनत घेतली होती. त्यांना आपल्या मुलाबरोबर दिल्लीत रहायचं होतं. अशरफला नोकरी मिळाल्यानंतर दिल्लीत घर विकत घेण्याचं त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं, असंही जफीर म्हणाला. अशरफ दोन महिन्यांपूर्वी इंग्लंडमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावून परतला होता. इंग्लंडमधील विद्यापीठामध्ये शिक्षण सुरु करण्याआधी अभ्यासानिमित्त काही कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी अशरफ सौदी अरेबिया आणि दुबईला जाणार होता.