Kejriwal Speech Mention Uddhav Thackeray: दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये मनी लॉण्ड्रींगचा आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जामिनावर बाहेर आल्यानंतर पहिल्याच भाषणामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला. दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुरुंगात जातील अशी भितीही व्यक्त केली.
केजरीवाल यांनी पंतप्रधान भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असल्याचं सांगतात आणि स्वत:च्या पक्षात चोरांना प्रवेश देतात असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीला टीका केली. "पंतप्रधान म्हणतात मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहे. त्यांनी देशातील सर्व चोरांना आपल्या पक्षात घेतलं आहे. ज्या व्यक्तीबद्दल पंतप्रधान 10 दिवसांपूर्वी 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत होते. काही दिवसांनंतर त्यांनाच आपल्या पक्षात घेऊन कोणाला उपमुख्यमंत्री बनवतात तर कोणाला मंत्रीपद देतात. त्यांची सर्व ईडी आणि सीबीआयची प्रकरणं बंद करतात. भ्रष्टाचारविरुद्ध लढायचं शिकायचं असेल तर केजरीवालकडून शिका असं मी सांगेल. 2015 मध्ये माझ्या एका मंत्र्याचा ऑडिओ माझ्याकडे आला. ज्यात मंत्री दुकानादारकडे पैसे मागत होता. मी स्वत: त्याला तुरुंगात पाठवला," असं केजरीवाल म्हणाले.
"तुम्ही सर्व चोरांना आपल्या पक्षात घेऊन केजरीवालला अटक करता. तुम्ही देशातील जनतेला वेडं समजू नका. देशातील लहान मुलांनाही ठाऊक आहे की चोरांना तुम्ही तुमच्या पक्षात घेऊन त्यांच्याविरुद्धच्या सीबीआय, ईडीची प्रकरण बंद केली. केजरीवालला अटक करुन त्यांनी देशात एक संदेश दिला की मी कोणालाही अटक करु शकतो. कोणतंही प्रकरण नसेल, गुन्हा नसेल तरी मी तुम्हाला अटक करु शकतो, असं त्यांना दाखवायचं आहे. पंतप्रधानांनी वन नेशन वन लीडर मिशन सुरु केलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात पाठवायचं आणि भाजपाच्या नेत्यांचं राजकीय अस्तित्व संपवायचं या दोन टप्प्यात काम सुरु आहे," असं गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला.
नक्की वाचा >> '2 महिन्यांमध्ये योगींना दूर करणार, 17 सप्टेंबर 2025 ला मोदी निवृत्त होणार अन्..'; केजरीवालांचा दावा
"हेमंत सोरेन यांना तुरुंगात पाठवलं, ममता बॅनर्जींच्या अनेक मंत्र्यांना तुरुंगात पाठवलं, स्टॅलिन यांच्या अनेक मंत्र्यांना तुरुंगात पाठवलं. केरळाच्या मुख्यमंत्र्यांच्या मागे लागले आहेत. हवं तर माझ्याकडून प्रतिज्ञा पत्रावर लिहून घ्या पण जर ते ही निवडणूक जिकंले तर ममता बॅनर्जी तुरुंगात असतील, स्टॅलिन तुरुंगात असतील. तेजस्वी यादव तुरुंगात असतील. उद्धव ठाकरे तुरुंगात असतील. विरोधी पक्षातील सर्व नेते तुरुंगात असतील," असंही केजरीवाल म्हणाले.
नक्की वाचा >> 'पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं तर..', पुण्यातून राज ठाकरेंचा इशारा; म्हणाले, 'हा राज ठाकरे..'
मोदींवर निशाणा साधताना केजरीवाल यांनी पंतप्रधानांकडून भाजपाच्या नेत्यांचं राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्यात आल्याचा दावा केला. "यांनी भाजपाच्या नेत्यांनाही सोडलं नाही. त्यांनी शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, मनोहर लाल खट्टर यांचं राजकीय अस्तित्व संपवलं. हे निवडणूक जिंकले तर पुढील दोन महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बदलला जाईल. यांची वन नेशन वन लीडरची योजना असून याचा अर्थ देशात एकच नेता राहिला पाहिजे असा आहे," असंही केजरीवाल म्हणाले.
नक्की वाचा >> 'मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..'
केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने 1 जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे. काल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज केजरीवाल कनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात देवदर्शनासाठी पोहोचले. त्यांनी हनुमानासमोर माथा टेकवत पूजा केली. त्यानंतर ते जवळच्या शनी मंदिरात आणि नवग्रह मंदिरातही गेले. यानंतर आम आदमी पार्टीच्या मुख्य कार्यालयात केजरीवाल यांनी समर्थकांना संबोधित केले.