नवी दिल्ली : दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर दगडफेकीचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीमध्ये एका बैठकीदरम्यान हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बवाना येथे पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीसाठी मनोज तिवारी शनिवारी दाखल झाले. बैठकीत मनोज तिवारी मार्गदर्शन करत असताना काही अज्ञातांनी हा हल्ला केला.
अज्ञातांनी मनोज तिवारी यांच्यावर दगड आणि काठ्या फेकल्या. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांकडून व्हिडिओ फुटेजच्या आधारावरही तपास केला जात आहे.
या प्रकरणी भाजप प्रवक्त्यांनी म्हटलं की, निवडणुकीत पराभव होत असल्याचं पाहून विरोधकांकडून हिंसाचाराचे मार्ग अवलंबले जात आहेत. या हल्ल्यात सुदैवाने मनोज तिवारी यांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी सांगितले की, या बैठकीत होणा-या व्हिडिओ शूटींगच्या मदतीने आम्ही आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत.
बवाना येथे २३ ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावल्याचं पहायला मिळत आहे.