नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने (आप) सकाळपासूनच आघाडी घेतली होती. मात्र पक्षाच्या मुख्य चेहर्यांपैकी एक उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पटपडगंज मतदारसंघात काटेरी लढत पाहायला मिळाली. सुरुवातीच्या फेरीत सिसोदिया यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांची ही आघाडी मागे पडल्यानंतर ते पराभूत होणार असेच चित्र दिसत होते. मात्र, ११ व्या फेरीतील मनीष सिसोदिया यांनी भाजपच्या उमेदवार रवींदरसिंग नेगी यांच्यावर आघाडी घेतली. त्यांनी भाजपचे उमेदवार रवींदरसिंग नेगी यांना पराभूत केले.
दिल्ली विधानसभेचे निकाल हाती येत असतानाच याचे निकाल आता जवळपास स्पष्ट झालेत. दिल्लीकरांनी पुन्हा एकदा आपला नेता म्हणून 'आप'चे प्रमुख आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीच निवड केली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांना तिसरी संधी मिळणार आहे. आप ६३ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ७ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपला मोठा पराभवाचा धक्का बसला आहे. 'आप'ने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
निवडणूक जिंकल्यानंतर मनीष सिसोदिया म्हणाले, हा शिक्षणाचा विजय आहे. भाजपने द्वेषाचे राजकारण केले. पटपडगंजमधून पुन्हा एकदा जिंकल्याचा आनंद झाला. तुम्ही शाहीन बागेला पाठिंबा दिला म्हणून तुम्हाला विजय मिळविण्यासाठी झगडावे लागले का, या प्रश्नवार ते म्हणालेत, याचा फारसे महत्वाचे नाही. याआधीच्या निवडणुकीत त्यांनी २८ हजाराहून अधिक मतांनी विजय मिळविला होता.
२०१५ साली ७० पैंकी तब्बल ६७ जागांवर विजय मिळवणारी आम आदमी पार्टी या घडीला ६३ जागांवर आघाडीवर आहे. तर २०१५ साली केवळ ३ जागांवर विजय मिळालेला भाजप सध्या ७ जागांवर आघाडीवर दिसत आहे. काँग्रेस गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही भोपळा फोडता आलेला नाही. काँग्रेसच्या एकूण मतांच्या गणितातही घसरण झालेली पाहायला मिळत आहे.