Daughter Kept Parents Hostage In Bhopal: पोटच्या मुलीने आई-वडिलांना चार महिन्यांपासून त्यांच्याच राहत्या घरात डांबून ठेवले. इतकंच नव्हे तर महिलेने आपल्या मनोरुग्ण भावालाही घरातच बांधून ठेवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. भोपाळमधील अरेरा कॉलनीत ही घटना समोर आली आहे. शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे.
आरोपी महिलेचा पती सैन्यात कर्नल पदावर कार्यरत आहे. मात्र ती नवऱ्यापासून फारकत घेऊन आई-वडिलांच्या घरी जबरदस्ती राहत आहे. महिलेसोबतच तिचा मुलगाही त्याच्या मनोरुग्ण मामाला मारहाण करत असे. तर आजी-आजोबांकडून जेवण हिसकावून घ्यायचा असा आरोप करण्यात आला आहे. शेजाऱ्यांना या प्रकरणाची खबर लागताच त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी महिला व तिच्या मुलाविरोधात डांबून ठेवणे, मारहाण करणेयासारखे गुन्हे दाखल केले आहेत. तसंच, आरोपींच्या शरीरावर माराहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.
सीएस सक्सेना असं पीडित वृद्धाचे नाव असून ते निवृत्त बँक अधिकारी आहेत. ते त्यांची पत्नी कनक सक्सेना व मुलगा विकी सक्सेनसोबत अरेरा कॉलनीत राहत होती. त्यांची मुलगी निधी सक्सेनाचा काही वर्षांपूर्वी लग्न लावून दिले होते. तिचे पती कर्नलपदावर कार्यरत होते. मात्र, काही वर्षांपूर्वी ती नवऱ्याला सोडून दोन मुलांसह वडिलांच्या घरी राहायला आली. व हळहळू सर्व घरावर कब्जा केला.
सीएस सक्सेना यांनी चार महिन्यांपूर्वी घर तिच्या नावावर करण्यास नकार दिल्यावर निधीने वडिलांसह आई व भावाला एका खोलीत डांबून ठेवले. फक्त जेवण देतानाच त्या खोलीचा दरवाजा उघडला जायचा. घरात उरलेले व शिळे जेवण ती आई-वडिलांना खाऊ घालायची, असंही तक्रारीत म्हटलं आहे. वडिलांनी याचा विरोध केल्यास, बाहेर काढण्याची मागणी केल्यास किंवा काही आवश्यक सामानाची मागणी केल्यास निधी त्यांना क्रिकेट बँट किंवा लाकडी दांडक्याने मारहाण करायची. कधीकधी निधीचा मुलगाही त्यांना बेल्टने मारायचा.
निधीने तिच्या वृद्ध वडिलांचे एटीएमही तिच्याजवळ ठेवले होते. तर, काही कागदपत्रांवर जबरदस्ती सह्याही करुन घेतल्या होत्या. त्यांचे पेन्शन खातेदेखील तीच वापरत होते. खात्यातून सगळे पैसे काढून तिच्याजवळ ठेवायची. तरीदेखील वडिलांना औषध आणण्यासाठी ती टाळाटाळ करायची, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
बऱ्याच दिवसांपासून सक्सेना घराबाहेर पडलेले दिसले नाही म्हणून त्यांच्या मित्रांनी निधीकडे त्यांची चौकशी केली. मात्र तिने उत्तर देण्यास टाळाटाळ केले. तेव्हा त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांच्यासोबत काही अघटित घडले असल्याची शंका आल्यावर त्यांनी पोलिसांसोबत संपर्क केला. त्यानंतर पोलिस सक्सेना यांच्याघरी पोहोचले व त्यांची सुटका केली.