Adenovirus : होळीच्या तोंडावर भारतात नवा व्हायरस; लहान मुलांना अधिक धोका

Adenovirus : आकडेवारीनुसार एडेनोव्हायरसमुळे आतापर्यंत 12 मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे होळीचा सण तोंडावर येऊन ठेपलाय. एडेनोव्हायरस संसर्गज्य विषाणू असल्याने होळीमध्ये तो इतर ठिकाणीही पसरण्याची शक्यता आहे

Updated: Mar 4, 2023, 12:55 PM IST
Adenovirus : होळीच्या तोंडावर भारतात नवा व्हायरस; लहान मुलांना अधिक धोका title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Adenovirus : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणाच्या (Holi 2023) पार्श्वभूमीवर भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोरोना व्हायरसच्या (Corona) सावटाखाली दोन वर्ष घालवल्यानंतर आता आणखी एक विषाणू पसरत आहे. एडेनोव्हायरस (Adenovirus) असे या विषाणूचे नाव असून  सध्या पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) तो वेगाने पसरत आहे. एडेनोव्हायरसने लहान मुलांना विळखा घालायला सुरुवात केल्यानं खळबळ उडाली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये एडेनोव्हायरसमुळे आतापर्यंत 12 मुलांचा मृत्यू झाला आहे. यापैकी आठ मुले ही आधीच कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त होती अशीही माहिती समोर आली आहे. प्रशासनाने मात्र हे मृत्यू एडेनोव्हायरसमुळे झाल्याचे मान्य केलेले नाही. तर हा संसर्गाचा आजार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे दोन वर्षांनी होळीचा सण निर्बंधमुक्तपणे साजरा करता येणार असल्याने मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे या व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता आहे. 

पश्चिम बंगालमध्ये प्रशासनाची तयारी

सरकारने मृत्यूची आकडेवारी मान्य केली नसली तर प्रशासनाने अधिक प्रसार टाळण्यासाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी तातडीची बैठक बोलावली होती. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयारी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 600 बालरोगतज्ञांसह 121 रुग्णालयांमध्ये पाच हजार खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, गेल्या एका महिन्यात तीव्र श्वसन संसर्गाची (ARI) 5,213 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. एआरआय ही दरवर्षी येणारी समस्या आहे. या वर्षी आणखी प्रकरणे समोर येत आहेत कारण गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे ती समोर आली नव्हती. तसेच  सरकारने 1800-313444-222 हा आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. 

या व्हायरसची लक्षणं काय आहेत?

एडेनोव्हायरसची लक्षणेही कोरोना व्हायरससारखीच असतात. त्यामुळेच हा कोरोनाचा आणखी एक प्रकार आहे का, असा संभ्रम अनेकांमध्ये निर्माण झालाय. एडेनोव्हायरसचा संसर्ग झाल्यास सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे दिसतात. याशिवाय ताप, घसा कोरडा पडणे, तीव्र श्वसन विका यासारख्या समस्या जाणवतात. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला निमोनिया, डोळे लाल होणे, जुलाब, उलट्या आणि पोटदुखी यांसारख्या लक्षणे जाणवतात. या विषाणूमुळे मूत्राशयाच्या संसर्गाचा धोकाही असतो.

कसा पसरतो एडेनोव्हायरस?

हा विषाणूजन्य आजार असल्याने, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने एडेनोव्हायरस पसरू शकतो. खोकल्यामुळे किंवा शिंकण्यानेही तो हवेतून पसरू शकते. जर एडेनोव्हायरस एखाद्या पृष्ठभागावर असेल आणि तुम्ही त्याला स्पर्श केला किंवा त्याच्या संपर्कात आला तर तुम्हालाही विषाणूची लागण होऊ शकते. काहीवेळा एडेनोव्हायरस संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेद्वारे देखील पसरू शकतो. 

एडेनोव्हायरसची लागण टाळण्यासाठी काय कराल?

या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी, कमीत कमी 20 सेकंद साबणाने हात धुवावेत. हातांनी वारंवार डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा. जर कोणी आजारी असेल तर त्याच्या संपर्कात येऊ नका. आजारी असताना घरीच रहा, घराबाहेर पडू नका. खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करा आणि मास्कदेखील वापरा. लक्षणे जाणवत असल्याच तु्म्ही वापरलेली भांडी इतरांना देणे टाळा.

एडेनोव्हायरससाठी कोणतेही विशिष्ट औषध किंवा उपचार नाही. बर्‍याच वेळा, एडेनोव्हायरस झालेल्या रुग्णांमध्ये लक्षणे ही सौम्य स्वरुपाची असतात. त्यामुळे औषधाने ती बरी केली जाऊ शकतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका, अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.