ममता दीदींनी मोदींचा फोन उचलला नाही?

ममता दीदींनी मोदींचा फोन उचलला नाही?

Updated: May 5, 2019, 05:51 PM IST
ममता दीदींनी मोदींचा फोन उचलला नाही? title=

नवी दिल्ली : फॅनी चक्रीवादळानंतर आता पंतप्रधान कार्यालय आणि पश्चिम बंगालचं मुख्यमंत्री कार्यालय यांच्या आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. पंतप्रधानांनी नुकसानी संदर्भात चर्चा केली नाही, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. त्यावर आता पंतप्रधान कार्यालयाने आपली बाजू मांडली आहे. फॅनी चक्रीवादळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दोन वेळा फोन केले, पण त्यांच्या फोनला उत्तरच मिळालं नाही, असा दावा पंतप्रधान कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

पंतप्रधान आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांच्यात संभाषण होऊ शकलं नाही. त्यामुळे अखेर पश्चिम बंगालमधील नुकसानीबाबत पंतप्रधान मोदी यांनी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयातून ममता बॅनर्जी यांना दोन वेळा फोन करण्यात आला. दोन्ही वेळा प्रत्युत्तर न मिळाल्याने संभाषण होऊ शकलं नाही. एका कॉलनंतर मुख्यमंत्री दौऱ्यावर असल्याचं उत्तर मिळालं, असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारतीय हवामान खात्याचं कौतुक

दरम्यान फॅनी चक्रीवादळाची अत्यंत अचूक माहिती दिल्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या आपत्ती निवारण विभागानं भारतीय हवामान खात्याचं कौतुक केलं आहे. भारतीय हवामान खात्यानं एवढी बिनचूक माहिती दिली की, त्यामुळे चक्रीवादळामुळे होणारा धोका टाळणं प्रशासनाला शक्य झालं. त्यामुळे कमी जीवीतहानी झाली, अशा शब्दात यूएनडीआरआरनं हवामान खात्याच्या पाठीवर शाबासकीची थाप ठोकली. याआधी २०१३ मध्ये विध्वंसक फैली चक्रीवादळ आलं होते, तेव्हा देखील ४५ लोकांचे बळी गेले होते, याकडेही यूएनडीआरआरचे प्रवक्ते डेनिस मॅकलीन यांनी लक्ष वेधलं.