नवी दिल्ली : भारत सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतल्याला आता एक वर्षापेक्षाही जास्त कालावधी उलटून गेला. मात्र, भारताचे शेजारी राष्ट्र नेपाळने अद्याप जुन्या नोटा भारताकडून बदलून घ्यायला सुरूवात केली नाही. महत्त्वाचे म्हणजे भारतातील आणि नेपाळमधीलही सर्वात मोठ्या बॅंकांनी जुन्या चलनी नोटा बदलण्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही.
नेमक्या याच कारणामुळे नेपाळमध्ये भारतीय जून्या चलनी नोटांना (५००,१०००,) कसीनो आणि हॉटेलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पाचशे रूपयांची सध्याची भारतीय चलनी नोट दिली असता ८०० नेपाळी नोट आणि जर जूनी (बंद झालेली) ५०० रूपयांची चलनी नोट दिली तर, ४०० नोपाली नोटा मिळू शकतात. कसीनो आणि डान्स बारमध्ये भारतीय चलनातील जून्या पाचशे हजाराच्या नोटा सहजपणे बदलल्या जातात. नेपाळची राजधानी काटमांडू येथेच वैध आणि अवैध असे जवळपास दोन हजारहून अधिक कसीनो आणि डान्स बार असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, नेपाळमध्ये असलेल्या या जून्या चलनी नोटांना तेव्हाच बदलले जाऊ शकते, जेव्हा काटमांडूच्या कसीनोमध्ये मोठी रक्कम लावली जाते. या जून्या चलनी नोटांना नेपाळमध्ये टोकन स्वरूपात खरेदी केले जाते. या टोकनच्या माध्यमातून पर्यटक कसिनोमध्ये चलन खरेदी करू शकतात.