Crime News In Marathi: आईने भेंडीची भाजी केली म्हणून पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेत मुलाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच, 21 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जर आरोपीने दंडाची रक्कम भरली नाही तर त्याला आणखी एक वर्ष शिक्षेत वाढ करण्यात येणार आहे. हरप्रीत कौर यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला आहे. ही घटना लुधियाना येथे घडली आहे.
17 ऑक्टोबर 2022 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी कोर्टाने आत्ता आरोपीला शिक्षा सुनावली आहे. सुरेंद्र सिंह असं आरोपीचे नाव असून त्यांच्याविरोधात 302 अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरेंद्र सिंह यांवी चरनजित कौर यांची हत्या केली होती. तर, सुरेंद्र सिंह यांच्या वडिलांनीच त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. सुरेंद्र सिंह यांना दोन मुलं असून मोठ्या मुलाचा घटस्फोट झाला होता. तर, धाकटा मुलगा सुरेंद्र सिंह हा अविवाहित होता.
सुरेंद्र सिंह याची आई ही गृहिणी होती. घटना घडली तेव्हा त्याची आई घरात जेवण बनवत होती. तिने तेव्हा भेंडीची भाजी बनवली होती. मात्र यावरुन आरोपीने तिच्यासोबत वाद घातला. बटाटा-फ्लॉवरची भाजी का केली नाही म्हणून आरोपी त्यांच्यावर चिडला होता. रागाच्या भरात आरोपीने त्याच्या आईला दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकले. नंतरही तो आईला लोखंडी पाईपने मारहाण करत होता. महिला गंभीर जखमी झाली होती.
आजूबाजूच्या रहिवाशांनी पाहिल्यानंतर त्यांनी जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेले रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झाल्यामुळं उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. चौकशीनंतर पोलिसांनी सुरेंद्रविरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटकही केला. आता जवळपास दोन वर्षांनंतर सुरेंद्रला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, आरोपीच्या वकिलाने कोर्टात दावा केला होता की, आरोपीच्या वडिलांनी संपूर्ण मालमत्ता मोठ्या मुलाच्या नावावर केली होती. त्यामुळं सुरेंद्र सिंह चिडला होता. त्यातूनच हा गुन्हा घडला होता. मात्र, कोर्टाने बचाव पक्षाच्या वकिलांचा हा दावा फेटाळून लावला आहे.