हैदराबादमध्ये मैत्री, बंगळुरुत हत्या अन्... दिल्लीतल्या तरुणाचं हादरवणारं कृत्य

Bengaluru Murder Case : मुंबईतील लिव्ह इन पार्टनरच्या हत्येचे प्रकरण गुलदस्त्यात असताना कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये लिव्ह इन पार्टनरची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर  संशयित तरुण फरार असल्याचे समोर आले आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 9, 2023, 01:05 PM IST
हैदराबादमध्ये मैत्री, बंगळुरुत हत्या अन्... दिल्लीतल्या तरुणाचं हादरवणारं कृत्य title=

Bengaluru Live In Partner Murder: मीरा रोडमध्ये (Mira Road) लिव्ह पार्टनरच्या हत्येने हत्येने खळबळ उडालेली असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीरा रोडमधील हादरवणाऱ्या घटनेपूर्वी, सोमवारी बंगळुरूमध्ये (Bengaluru Crime) एका 23 वर्षीय मुलीची तिच्या 27 वर्षीय आधीच्या लिव्ह-इन पार्टनरने (live in partner) गळा आवळून हत्या केली. मंगळवारी तरुणीची रूममेट घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली. हैदराबादची रहिवासी असलेली आकांक्षा बंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होती. तर अर्पित असे आरोपीचे नाव असून तो मूळचा दिल्लीचा रहिवासी आहे. अर्पित हा बायजू या टेक कंपनीमध्ये काम करत असल्याचे समोर आले आहे.

बंगळुरू पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप अर्पितला अटक केलेली नाही. सोमवारी अर्पित आकांक्षाला भेटण्यासाठी बंगळुरूला आला होता. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर अर्पितने आकांक्षाचा गळा आवळून खून केला. आकांक्षाच्या हत्येला आत्महत्या भासवण्याच्या प्रयत्नात अर्पितने तिचा मृतदेह पंख्याला लटकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला हे जमले नाही. नंतर त्याने मृतदेह जमिनीवरच सोडला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

आकांक्षा ही तेलंगणातील गोदावरी खानी येथील कोडिहल्ली येथील रहिवासी होती. 23 वर्षीय आकांक्षाने हैदराबादमधील एका सॉफ्टवेअर कंपनीतून कामाला सुरुवात केली होती.नोकरीदरम्यानच आकांक्षाची अर्पितशी भेट झाली होती. अर्पित हा दिल्लीचा रहिवासी होता आणि आकांक्षा ज्या कंपनीत काम करत होती त्याच कंपनीत तोही काम करत होता. यानंतर भेटीगाठींचे प्रकरण वाढले. दोघांमध्ये जवळीक वाढल्यावर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळेत त्यांच्याच वारंवार वाद होऊ लागला. त्यानंतर आकांक्षा कामानिमित्त बंगळुरु येथे स्थायिक झाली. त्यावेळीही अर्पित हा सुट्टीच्या दिवशी आकांक्षाला भेटायला यायचा. सोमवारीसुद्धा अर्पित भेटायला आला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी आकांक्षाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

दरम्यान, पोलिस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा मैत्रिण मंगळवारी फ्लॅटवर परतली तेव्हा घडलेला सर्व प्रकार समजला. आकांक्षाच्या मैत्रिणीने याची माहिती पोलिसांना दिली, त्यांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अर्पित आणि आकांक्षा दुपारी 3.10 च्या सुमारास एकत्र त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले होते. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजनुसार 4.50 च्या सुमारास अर्पित एकटाच फ्लॅटमधून बाहेर पडताना दिसला. यावेळी अर्पितने आपला मोबाईल आणि बॅग रुमवरच सोडली होती.