काँग्रेसमध्ये आऊटसोर्सिंग! कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी करणार प्रवेश?

पडद्यामागे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची महत्त्वाची भूमिका

Updated: Sep 16, 2021, 05:01 PM IST
काँग्रेसमध्ये आऊटसोर्सिंग! कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी करणार प्रवेश? title=

नवी दिल्ली: एकीकडे काँग्रेस पक्षाचे (Congress) युवा नेते इतर पक्षांमध्ये सामील होत आहेत, आणि दुसरीकडे पक्ष याची भरपाई करण्यासाठी नवीन युवा नेत्यांना आउटसोर्सिंग करण्याच्या प्रयत्नात आहे. कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) आणि जिग्नेश मेवानी (Jignesh Mevani) लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात अशी माहिती आहे

कन्हैया कुमारने घेतली राहुल गांधींची भेट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (CPI) नेते आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे कन्हैया कुमार लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, असं बोललं जात आहे. बिहार काँग्रेसमध्ये (Bihar Congress) कन्हैया कुमार यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याचीही चर्चा आहे. त्यांना बिहार काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनवले जाऊ शकतं.

काँग्रेसला युवा नेत्यांची गरज

कन्हैया कुमारसोबतच काँग्रेस पक्ष गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांना आउटसोर्स करण्याची तयारी करत आहे. जिग्नेश यांना गुजरात काँग्रेसमध्ये (Gujarat Congress) मोठी जबाबदारी मिळू शकते. गुजरातमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत हार्दिक पटेल आणि जिग्नेशसारख्या तरुण नेत्यांना निवडणूक प्रचाराची कमान दिली जाऊ शकते. आउटसोर्सिंगची ही प्रक्रिया काँग्रेसमध्ये या आधीपासूनच सुरू झाली होती. नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजप सोडल्यानंतर काँग्रेसने पक्षात प्रवेश दिला आणि आज ते पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

आउटसोर्सिंगची कल्पना कोणाची?

आता असा प्रश्न विचारला जात आहे की आऊटसोर्सिंगची ही कल्पना नेमकी कोणाची आहे? तर या मागे राजकीय निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (prashant kishor) यांचा मोठा हात असल्याचं बोललं जात आहे. मात्र, स्वत: प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये कधी प्रवेश करणार, याबाबत बराच काळ अंदाज वर्तवला जात आहे. 

काँग्रेस पक्षाला या तरुण नेत्यांना आउटसोर्स करण्याची गरज का आहे हा प्रश्न आहे. याचं कारण स्पष्ट आहे, 2014 पासून आत्तापर्यंत, राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि केंद्रीय नेतृत्वावर नाराज झाल्यानंतर, पक्षाचे अनेक युवा नेते काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये सामील झाले आहेत. अशा नेत्यांची यादी मोठी आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला युवा नेत्यांची गरज आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत विस्वा शर्मा, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद, सुष्मिता देव आणि प्रियंका चतुर्वेदी यातील बहुतेक नेत्यांना काँग्रेस सोडण्याचे बक्षीस मिळालं आहे. याला उत्तर देण्यासाठी काँग्रेस पक्षाने प्रशांत किशोर, जिग्नेश मेवानी आणि कन्हैया यांच्या माध्यमातून काँग्रेसला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.