CORONA : तिसऱ्या लाटेची टकटक! ही चार राज्य कोरोनाचे 'हॉट स्पॉट'

कोरोनाव्हायरस  (Coronavirus) साथीच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु असताना देशभरात कोरोना संक्रमित लोकांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. 

Updated: Sep 3, 2021, 10:34 AM IST
CORONA : तिसऱ्या लाटेची टकटक! ही चार राज्य कोरोनाचे 'हॉट स्पॉट' title=

मुंबई : कोरोनाव्हायरस  (Coronavirus) साथीच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु असताना देशभरात कोरोना संक्रमित लोकांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. यामुळे सरकारकडून सर्वसामान्यांपर्यंत चिंतेची रेषा ओढली गेली आहे. लोक पुन्हा एकदा घाबरुन गेले आहेत. भारतात गेल्या 6 दिवसांपासून 40 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत.

देशात गेल्या दोन दिवसांत कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 47,092 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 509 जणांचा मृत्यू झाला आहे. ही रुग्णसंख्या गेल्या दोन महिन्यांत नोंदली गेलेली सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले आहे. काही राज्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यात डेल्टाचे रुग्ण अधिक दिसून येत आहे.

24 तासात 47 हजार रुग्ण सापडले

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले, 'गेल्या 24 तासांमध्ये सुमारे 47 हजार नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. केरळमधून जास्तीत जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या आठवड्यात नोंदवलेल्या कोरोना विषाणूच्या 69 टक्के रुग्ण केरळमधील आहेत. लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. अजूनही 42 जिल्हे असे आहेत जिथे दररोज 100 पेक्षा जास्त कोरोनाच्या रुग्णांची नोंद केली जात आहे. 

ही राज्ये कोरोनाची हॉट स्पॉट 

भूषण म्हणाले, 'एकट्या केरळमध्ये 1,00,000 पेक्षा जास्त बाधित रुग्ण आहेत. त्याचवेळी, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये संक्रमित रुग्णांची संख्या 10,000 ते 1,00,000 दरम्यान आहे. तथापि, हा 9 वा आठवडा आहे. ज्यावेळी देशातील साप्ताहिक पॉझिटिव्ह दर 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशातील 38 जिल्ह्यांमध्ये, साप्ताहिक पॉझिटिव्ह दर 5-10 टक्के दरम्यान आहे. यामुळे कोरोना लसीकरणाची गती वाढविण्यात येत आहे. केवळ ऑगस्ट महिन्यात 18.38 कोटी डोस दिले गेले. म्हणजेच एका दिवसात सरासरी 59.29 लाख लसी दिल्या गेल्या. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वेग वाढविण्यात आला आणि दररोज 80 लाखांहून अधिक लस दिल्या.

सणापूर्वी हे काम करा

त्याचवेळी, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे संचालक बलराम भार्गव म्हणाले, 'धोका अजूनही कायम आहे. लस रोगाच्या तीव्रतेपासून संरक्षण करते. परंतु लसीकरणानंतरही मास्क आवश्यक आहे. काही लोक यात निष्काळजी असतात आणि मास्कशिवाय मोठ्या कार्यक्रमांत सहभागी होत आहेत. आपल्याला हे काम करण्यापासून परावृत्त करावे लागेल. संपूर्ण लसीकरणानंतरच आगामी सणांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. तरच कोरोनाला लगाम घालता येईल.

गरोदर महिलांनी प्रथम लसीकरण करावे

नीति आयोगाचे सदस्य विनोद कुमार पॉल  (V.K. Paul) म्हणाले, 'आपल्याला सावध राहावे लागेल. सण येत आहेत, हंगाम बदलत आहे. आपल्याला लस घ्यावी लागेल, हाच प्रतिबंधाचा एकमेव मार्ग आहे. मास्कशिवाय जगण्याची संधी अजून आलेली नाही. गेल्या वर्षीप्रमाणे सण साजरे केले जाणार आहेत. गणेश चतुर्थी, नवरात्री दरम्यान आम्हाला गर्दी करायची गरज नाही. सर्व सण घरी साजरे केले जावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा, आपण आत्तापर्यंत जे काही जपले आहे ते आपल्यापासून हिरावून घेतले जाऊ शकते. जर व्हायरसचा उद्रेक पुन्हा झाला तर समस्या वाढू शकते. गरोदर महिलांना सर्वाधिक त्रास होईल, म्हणून त्यांना आधी कोरोना लस घेण्याचा सल्ला दिला गेला आहे.