coronavirus : जगातील सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण भारतात

भारतात कोरोना व्हायरसचे नवे रुग्ण आणि मृतांचा आकडा, जगाच्या तुलनेत कमी आहे.

Updated: Jul 8, 2020, 04:47 PM IST
coronavirus : जगातील सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण भारतात title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. परंतु भारताची स्थिती इतर अनेक देशांहून काहीशी बरी आहे. भारतात दररोज 10 लाख लोकसंख्येमध्ये 315 लोक बरे होत आहेत. तर 10 लाख लोकांमध्ये कोरोनाचे 186 ऍक्टिव्ह रुग्ण समोर येत आहेत. हे मूल्यांकन आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या कोरोना व्हायरसच्या आकडेवारीच्या आधारे केलं गेलं आहे.

दिल्लीत दर दहा लाख लोकसंख्येमध्ये जवळपास 3497 रुग्ण दररोज बरे होत आहेत. तर दहा लाख लोकसंख्येमध्ये 1,242 रुग्ण समोर येत आहेत. जवळपास अनेक राज्यांची स्थिती अशाच प्रकारची आहे. भारतातील प्रत्येक राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ऍक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत जास्त आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, भारतात प्रति 10 लाख लोकसंख्येमध्ये 14 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. तर जगात सरासरी प्रति 10 लाख लोकसंख्येमध्ये 68 रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे भारतात कोरोना व्हायरसचे नवे रुग्ण आणि मृतांचा आकडा, जगाच्या तुलनेत कमी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार. भारतात कोरोना व्हायरचा रिकव्हरी रेट 61 टक्के इतका आहे. तर कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 2.78 टक्के इतकं आहे. भारतात सध्या एकूण 1201 रुग्णालयं पूर्णपणे कोविड रुग्णांवरच उपचार करत आहेत. त्याशिवाय भारतात 2611 कोविड केयर सेंटर आणि 9909 कोविड सेंटर आहेत.

भारतात कोरोना रुग्णसंख्या सतत वाढते आहे. परंतु कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे, त्यामुळे ही काहीशी दिलासादायक बाब म्हणावी लागेल.