President Election Result : राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. या फेरीत खासदारांच्या मतांची मोजणी झाली असून त्यात द्रौपदी मुर्मूला मोठी आघाडी मिळाली आहे. मतमोजणीत गुंतलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रौपदी मुर्मू यांना ७४८ पैकी ५४० मते मिळाली. याशिवाय यशवंत सिन्हा यांना 208 मते मिळाली आहेत. त्याचवेळी मतमोजणीदरम्यान 15 मते अवैध आढळून आली. एकूण 748 वैध मते सापडली असून त्यांची किंमत 5 लाख 23 हजार 600 इतकी आहे. त्यापैकी 540 मते द्रौपदी मुर्मू यांना गेली, ज्यांचे मूल्य 3,78,000 आहे. दुसरीकडे यशवंत सिन्हा मोठ्या मताधिक्याने मागे पडलेले दिसतात. त्यांना केवळ 208 मते मिळाली असून त्यांची मते केवळ 1,45,600 इतकीच असल्याचा अंदाज आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानून भाजपने जोरदार तयारी केली आहे. मतमोजणी संपल्यानंतर आज सायंकाळी 5.30 वाजता दिल्लीतील पंत मार्ग ते राजपथ असा रोड शो होणार आहे. ज्यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता नेतृत्व करणार आहेत. या रोड शोमध्ये पक्षाचे अनेक खासदार, आमदार आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी सोमवारी म्हणजेच 18 जुलै रोजी मतदान झालं होतं. भाजपप्रणित एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांच्या वतीने यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड असल्याचं मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केलं आहे.
जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकल्या तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनतील. यापूर्वी आजपासून 15 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 21 जुलै रोजी देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या. प्रतिभा देवीसिंह पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.