केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशातील जिल्ह्यांची तीन भागात विभागणी

सध्याच्या घडीला देशात १७० हॉटस्पॉट जिल्हे आहेत. तर आणखी २०७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. 

Updated: Apr 15, 2020, 05:08 PM IST
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशातील जिल्ह्यांची तीन भागात विभागणी title=

नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील जिल्ह्यांची तीन भागात विभागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता देशातील जिल्ह्यांची हॉटस्पॉट, नॉन-हॉटस्पॉट आणि ग्रीन झोन अशा तीन भागांमध्ये वर्गवारी करण्यात येईल. कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असलेले जिल्हे हॉटस्पॉट या वर्गवारीत असतील. 

सध्याच्या घडीला देशात १७० हॉटस्पॉट जिल्हे आहेत. तर आणखी २०७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती आटोक्यात न आल्यास हे जिल्हेही हॉटस्पॉट वर्गवारीत समाविष्ट करण्यात येतील. तर आतापर्यंत देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, तेथील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

कोरोनाबाबत शास्त्रज्ञांचा इशारा, तर २ वर्ष लॉकडाऊन लागू करावे लागेल

याशिवाय, आरोग्य मंत्रालयाकडून प्रत्येक राज्याला स्पेशल कोविड रुग्णलायाची स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्व राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. 

लॉकडाऊनमध्येही वांद्रे स्टेशनवर गर्दी, अफवा का षडयंत्र?

दरम्यान, गेल्या २४ तासात देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या १,१७३ ने वाढली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ११,४३९ इतका झाला आहे. यापैकी ३७७ जणांचा मृत्यू झाला असून १,३०६ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण ११.४१ टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.