coronavirus : 'या' राज्यात प्लाझ्मा दान करणाऱ्याला सरकारकडून ५ हजारांचं बक्षीस

प्लाझ्मा दान करुन एखाद्याचा जीव वाचवण्यासह, 5000 रुपयांचं बक्षीसही देण्यात येणार आहे.

Updated: Jul 16, 2020, 05:06 PM IST
coronavirus : 'या' राज्यात प्लाझ्मा दान करणाऱ्याला सरकारकडून ५ हजारांचं बक्षीस  title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्लाझ्माची मागणीही वाढते आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा उपयुक्त असल्याचं सिद्ध होत आहे. या दरम्यान कर्नाटक सरकारने कोरोनामुक्त लोकांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं असून, प्लाझ्मा दान केल्यानंतर त्याबदल्यात बक्षीसही देण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्लाझ्मा दान करुन एखाद्याचा जीव वाचवण्यासह, सरकारकडून 5000 रुपयांचं बक्षीसही देण्यात येणार आहे.

कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने प्रत्येक प्लाझ्मा दात्याला त्याच्या या कामाची दखल घेत, प्रशंसनीय रक्कम म्हणून 5 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर म्हणाले की, राज्यात आतापर्यंत 17,390 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. 4993 लोक बंगळुरुमधील आहेत. के. सुधाकर यांनी कोरोनामुक्त झालेल्या लोकांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं आहे. 

तसंच प्लाझ्मा दात्याला प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून कोरोनामुक्त लोकांनी स्वेच्छेने पुढे येत, इतर रुग्णांना प्लाझ्मा दान करुन त्यांना बरे होण्यास मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, दिल्लीतील Institute of Liver and Biliary Sciences (ILBS)मध्ये देशातील पहिली प्लाझ्मा बँक सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर दिल्ली सरकारने एलएनजेपी हॉस्पिटलमध्येही प्लाझ्मा बँक सुरु केली आहे. ओडिशा सरकारनेही प्लाझ्मा बँक सुरु केली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कटक येथील एसबीसी मेडिकल कॉलेजमध्ये प्लाझ्मा बँकेचं उद्घाटन केलं.