नवी दिल्ली : भारतात बुधवारी कोरोना व्हायरसमुळे 507 जणांचा मृत्यू झाला. जून महिन्यात कोरोना संसर्गाची मोठी वाढ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे काही राज्यांनी लॉकडाऊनमधील नियम अधिक कठोर केले आहेत. आरोग्य मंत्रायलाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत 17 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांपैकी महाराष्ट्र, दिल्ली आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये 70 टक्के मृत्यू झाले असल्याची माहिती मिळत आहे.
बुधवारी एका दिवसांत कोरोनाचे नवे 18,653 रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना रुग्णांची देशातील एकूण संख्या 5,85,493 इतकी झाली आहे. मात्र रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही हळूहळू चांगलं होत आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 60 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे.
आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्णांमध्ये सलग पाचव्या दिवशी 18 हजारहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जून महिन्यात देशात कोरोनाचे 3,94,958 रुग्ण वाढले. जे एकूण रुग्णांपैकी 68 टक्के आहेत. सध्या देशात 2,20,114 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 3,47,978 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जवळपास 59.43 टक्के रुग्ण बरे झाले आहे.
भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी केरळमध्ये आढळला होता. हा रुग्ण चीनच्या वुहानमधून केरळमध्ये परतला होता. तर आरोग्य अधिकाऱ्यांकडून कर्नाटकात 12 मार्च रोजी देशातील पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.