मुंबई : कोरोना व्हायरस कधी संपुष्टात येणार? हा एकमेव प्रश्न प्रत्येकाला सतावत आहे. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. कोविड-१९ म्हणजे महामारी सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत भारतात संपुष्टात येणार आहे. आरोग्य मंत्रालयातील दोन आरोग्य विशेष तज्ज्ञांनी याबाबत दावा केला आहे. हा दावा मांडण्याकरता त्यांनी गणिती प्रारूपाच्या मदतीचा आधार घेतला आहे.
जेव्हा कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या ही मृत्यू किंवा बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येइतकी होते तेव्हा स्थिरांक १०० टक्क्यांना पोहोचतो आणि साथ आटोक्यात आल्याचे स्पष्ट होते.
विश्लेषणातून ही गोष्ट समोर आली आहे की, जेव्हा गुणांक १०० टक्क्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा महामारी संपुष्टात येणार आहे. हे विश्लेषण ऑनलाईन जर्नल एपीडेमीयोलॉडी इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. या संशोधनात सार्वजनिक आरोग्य विभागाचे उप महासंचालक डॉ. अनिल कुमार, कुष्ठरोग विभागाच्या उप सहायक संचालक रूपाली रॉय यांनी भाग घेतला. या माहितीकरता त्यांनी 'बेलीज गणितीय प्रारूप'चा संदर्भ घेऊन अंदाज केला आहे.
या विश्लेषणात कोरोना संक्रमीत रूग्णांचा आकडा आणि यामधून बरे झालेल्या रूग्णांचा आकडा यांचा समावेश असतो. भारतात कोरोना महामारीचा पहिला रूग्ण दोन मार्च रोजी सापडला. त्यानंतर कोविड-१९ चे रूग्ण पॉझिटिव्ह असल्याच्या घटना समोर आल्या.
विश्लेषण करण्यासाठी विशेषतज्ज्ञांनी भारतात कोवि़ड-१९ करता वर्ल्डमीटर्स डॉट इंफोकडून १ मार्च ते १९ मार्चपर्यंतची आकडेवारी घेतली. यामध्ये कोरोनाबाधित रूग्ण, संक्रमणमुक्त झालेला रूग्णांचा आकडा आणि कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांचा आकडा घेतला.