Corona virus in India : भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. काही दिवसांपासून रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र आता पुन्हा एकदा रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. पॉझिटिव्हिटी रेट 1% वर गेला आहे. नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ही वाढली आहे. 24 तासांत सक्रिय रुग्णांची संख्या 1,194 ने वाढली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 26,976 वर पोहोचली आहे.
केरळ, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. 24 तासांत केरळमध्ये 1383, महाराष्ट्रात 1036 आणि दिल्लीत 247 रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच देशभरात जेवढी नवीन प्रकरणे समोर आली आहेत, त्यापैकी 70 टक्क्यांहून अधिक नवीन प्रकरणे या तीन राज्यांमध्ये आली आहेत.
Omicron चा उप-प्रकार BA.4 आणि BA.5 हे देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढीस कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. 28 मे रोजी महाराष्ट्रात चार BA.4 आणि तीन BA.5 रुग्ण आढळले होते.
BA.4 आणि BA.5 मुळे प्रकरणे वाढत आहेत. दक्षिण आफ्रिकेत या दोन उप-प्रकारांमुळे, कोरोनाची पाचवी लाट आली होती, जी आता थोडी कमी होत आहे.
दोन्ही उप-प्रकारांची तीव्रता कमी आहे. म्हणजेच बहुतांश रुग्णांना त्याची लागण होऊन गंभीर आजार होत नाही. असे असले तरी, हे दोन्ही उप-प्रकार ओमिक्रॉनच्या मागील उप-प्रकारांपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांच्यामुळे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका वाढला आहे
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, BA.4 आणि BA.5 मुळे सध्या गंभीर आजार होत नाहीत, परंतु ते Omicron च्या इतर उप-प्रकारांपेक्षा जास्त संसर्ग पसरतो. डब्ल्यूएचओने गेल्या महिन्यात अहवाल दिला की जगातील डझनभर देशांमध्ये BA.4 आणि BA.5 ची प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि यामुळे कोरोना प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होते आहे.