Satish Malhotra: जगभरात मंदीचे वातावरण आहे. भविष्यात होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जगभरातील मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. अलीकडे अॅमेझॉन, फेसबुक, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी त्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. अनेक क्षेत्रांना याची झळ पोहोचली असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीची शाश्वती राहीली नाही. पण एक बॉस आहे ज्याने आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी स्वतःचा पगार कापला आहे. सतीश मल्होत्रा असे या उदार बॉसचे नाव आहे. त्यांनी उचललेले पाऊल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण हे वास्तव आहे. बॉसने कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ देण्यासाठी स्वत:चा पगार कमी केला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सतीश मल्होत्रा हे अमेरिकन स्पेशॅलिटी रिटेल चेन कंपनी 'द कंटेनर स्टोअर'चे सीईओ आहेत. खर्च कमी करण्यासाठी आणि कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्यासाठी त्यांनी स्वत:च्या पगारात स्वेच्छेने 10% पगार कपात केली आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे दाखल केलेल्या फाइलिंगमध्ये कंपनीने माहिती दिली आहे. मल्होत्राचा वार्षिक पगार सहा महिन्यांच्या कालावधीसाठी US $9,25,000 वरून $8,32,500 पर्यंत कमी होणार आहे.
सतीश मल्होत्रा हे फेब्रुवारी 2021 पासून 'द कंटेनर स्टोअर'चे प्रमुख आहेत. त्यांनी कठीण काळात कर्मचाऱ्यांची काळजी घेतली. गेल्या वर्षी, मल्होत्राचे एकूण कम्पन्शन $2.57 दशलक्ष होते. मात्र, मल्होत्रा यांच्या या पावलानंतर कर्मचाऱ्यांची सरासरी वेतनवाढ किती असेल? हे स्पष्ट झालेले नाही. कंपनीचा तोटा कमी करण्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याऐवजी स्वत:चा पगार कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सतीश मल्होत्रा, Apple CEO टिम कुक आणि गुगल सीईओ सुंदर पिचाई यांच्या सीईओच्या यादीत सामील झाले. ज्यांनी मोठ्या प्रमाणात खर्चात कपात करून यावर्षी पगारात कपात केली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये 12,000 कर्मचार्यांच्या कपातीची घोषणा केल्यानंतर केवळ 10 दिवसांनंतर, सीईओ सुंदर पिचाईंनी प्रतिक्रिया दिली. वरिष्ठ उपाध्यक्ष स्तरावरील सर्व कर्मचार्यांच्या वार्षिक बोनसमध्ये कपात केली जाईल. मात्र, किती पगार कपात होणार आणि किती काळासाठी याबाबत कोणतीही माहिती पिचाई यांनी दिली नाही.