"मनमोहन सिंग सरकारच्या काळात..."; 'प्रोजेक्ट चीता'वर काँग्रेसने ठोकला दावा

नामिबियातून चित्ते भारतात येण्याला काही तासांचाच अवधी उरला आहे

Updated: Sep 16, 2022, 11:41 PM IST
"मनमोहन सिंग सरकारच्या काळात..."; 'प्रोजेक्ट चीता'वर काँग्रेसने ठोकला दावा title=

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या वाढदिवशीच म्हणजे शनिवारी आफ्रिकन देश नामिबियातून चित्ता आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. नामिबियातील चित्तेही भारतात येण्याच्या तयारीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 
(PM Narendra Modi's Birthday) श्योपूरच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ता पुन्हा परतणार आहे.

नामिबियातून चित्ते भारतात येण्याला काही तासांचाच अवधी उरला आहे. मात्र त्यापूर्वीच राजकारण सुरू झाले आहे. मनमोहन सिंग सरकारच्या (manmohan singh government ) काळात 'प्रोजेक्ट चीता'चा (project cheetah) प्रस्ताव मंजूर झाल्याचा दावा काँग्रेस पक्षाने शुक्रवारी केला. शनिवारी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांचे आगमन होण्याआधीच काँग्रेस पक्षाने हा दावा केला आहे. 

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत याबाबत भाष्य केलं आहे.  "2008-09 मध्ये प्रोजेक्ट चीता प्रस्ताव तयार केला होता. मनमोहन सिंग यांच्या सरकारने त्यास मान्यता दिली. एप्रिल 2010 मध्ये तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश (jairam ramesh) आफ्रिकेतील चित्ता आऊट रीच सेंटरमध्ये गेले होते.  2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्पाला स्थगिती दिली, 2020 मध्ये बंदी उठवण्यात आली. पण आता चित्ते येतील," असे काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) गुरुवारी एक निवेदन जारी केले की पंतप्रधानांनी कुनो नॅशनल पार्कमध्ये वन्य चित्ते आणणे  हा भारतातील वन्यजीव आणि वन्यजीव अधिवासाचे पुनरुज्जीवन आणि वैविध्यपूर्ण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. 1952 मध्ये भारत सरकारने चित्ते नामशेष झाल्याचे घोषित केले होते. त्यानंतर आता पुन्हा 70 वर्षानंतर चित्ते भारतात परतणार आहेत.

1948 मध्ये छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील साल जंगलात चित्ता शेवटचा दिसला होता. मोठ्या प्रमाणात शिकारीमुळे देशातून नामशेष झालेल्या चित्ताला परत आणून भारत पर्यावरणीय असंतुलन दूर करत आहे, असे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी शुक्रवारी सांगितले.

नामिबियाची राजधानी विंडहोक येथून विशेष मालवाहू विमान बोइंग 747-400 ने पाच मादी आणि तीन नर चित्ते ग्वाल्हेर विमानतळावर आणले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी या चित्त्यांना जयपूरला आणले जाणार होते.