Loksabha Election 2019 : राहुल गांधी केरळमधूनही निवडणुकीच्या रिंगणात; काँग्रेसची घोषणा

दोन मतदार संघांतून लढणार निवडणूक

Updated: Mar 31, 2019, 11:45 AM IST
Loksabha Election 2019 : राहुल गांधी केरळमधूनही निवडणुकीच्या रिंगणात; काँग्रेसची घोषणा  title=

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसोबतच आणखी एका मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांना केरळच्या वायनाड येथून उमेदवारी देण्यात येणार असल्यासंबंधीची घोषणा रविवारी नवी दिल्लीत करण्यात आली. काँग्रेसकडून याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली. 

काँग्रेसच्या दृष्टीने सोयीच्या समजल्या जाणाऱ्या या मतदार संघात आता राहुल गांधी यांना मतदार कौल देणार का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी एकूण दोन मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर करताच त्यांच्या उमेदवारीवर प्रश्न  उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींचं उदाहरण दिल्याचं पाहायला मिळालं. 

अमेठीतून निवडून येणार की नाही, साबाबत साशंकता असल्यामुळेत राहुल गांधी यांनी दोन जागांवर निवडणून लढण्याचं ठरवलं का? असा प्रश्न विचारण्यात आला असता सुरजेवाला यांनी मोदींचं उदाहसण दिलं. मोदींनी गुजरात सोडून वाराणासीहून निवडणूक का लढली? त्यांना गुजरातच्या मतदार संघाविषयी आत्मविश्वास नव्हता? असा प्रतिप्रश्न उपस्थित करत त्यांनी हे सारे प्रश्नच निरर्थक असल्याचं म्हटलं. 

२३ मार्चला रोजीच केरळचे काँग्रेस अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी राहुल गांधी हे वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. पण, यामध्ये इतरही काही मतदार संघांच्या नावांचा समावेश होता. राहुल गांधी हे २००४ पासून अमेठीतून खासदार आहेत. २००४ आणि २००९ मध्ये राहुल गांधी यांचा मोठा मताधिक्यांनं विजय झाला होता. पण २०१४ मध्य़े मात्र त्यांना मोठा धक्का बसला होता.