राहुल गांधी यांना दिलासा! देशाच्या राजकारणावर आणि I.N.D.I.A वर काय होणार परिणाम?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय... मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधींना झालेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय... या निर्णयाचा देशाच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणाराय  

राजीव कासले | Updated: Aug 4, 2023, 08:38 PM IST
राहुल गांधी यांना दिलासा! देशाच्या राजकारणावर आणि I.N.D.I.A वर काय होणार परिणाम? title=

Rahul Gandhi : 'सत्याचा नेहमीच विजय होतो 'मोदी आडनाव (Modi Surname Case) बदनामी प्रकरणात सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) शिक्षेला स्थगिती दिली, त्यानंतरची त्यांची ही प्रतिक्रिया. राहुल गांधी आणि काँग्रेस (Congress) पक्षासाठी शुक्रवारचा दिवस आनंदाचा दिवस ठरला.. सूरत कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यामुळं राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली होती. गुजरात हायकोर्टानंही शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं. मात्र सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली.

सुप्रीम कोर्ट काय म्हणालं? 
सूरत कोर्टाने दिलेल्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले. या खटल्यात सर्वोच्च शिक्षा देण्यात आलं. एवढी कठोर शिक्षा का दिली, हे सूरत न्यायाधीशांनी सांगायला हवं होतं. हे केवळ राहुल गांधींच्या अधिकाराचं प्रकरण नाही, तर ज्या वायनाडच्या नागरिकांचं प्रतिनिधित्व ते करतात, त्यांच्या अधिकारांवरही गदा आली होती, असं सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशात नमूद केलंय. या निर्णयामुळं राहुल गांधींना आता खासदारकी परत मिळणार असून, ते संसद अधिवेशनात देखील सहभागी होऊ शकतात, असा दावा वकिलांनी केलाय.

या निकालानंतर काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधींचं जंगी स्वागत करण्यात आलं. आता किती तासात खासदारकी पुन्हा बहाल करतात तेच पाहायचं आहे असा टोला काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी लगावला. या निकालाचा परिणाम राहुल गांधी, काँग्रेस पक्ष आणि देशाच्या राजकारणावर देखील होणाराय.

निकालामुळं काय बदलणार?
सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळणार आहे. खासदारकी मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा दिल्लीत घरही मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी 2024ची लोकसभा निवडणूक लढवू शकतील. राहुल गांधी हे विरोधी INDIA आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात

देशभरातील 26 पक्ष एकत्र येऊन बनवलेली I.N.D.I.A आघाडी नव्याने रणनिती आखण्याची शक्यता आहे. बंगळुरुच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून राहुल गांधी यांचं नाव पुढे केलं होतं. राहुल आमचे पहिल्या पसंतीचे नेते असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. 

केंद्रातील भाजप सरकारविरोधात इंडिया आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत. अशावेळी राहुल गांधींच्या बाजूनं सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानं विरोधकांचे हौसले आणखी बुलंद झालेत. भाजप विरुद्ध काँग्रेस, नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी या संघर्षाला आणखी धार येणार आहे.