दिल्लीतील घटनेला गृहमंत्री जबाबदार, काँग्रेस-राष्ट्रवादीची राजीनाम्याची मागणी

दिल्लीतल्या हिंसाचारावरून जोरात राजकारण रंगलं आहे. 

Updated: Feb 26, 2020, 03:20 PM IST
दिल्लीतील घटनेला गृहमंत्री जबाबदार, काँग्रेस-राष्ट्रवादीची राजीनाम्याची मागणी title=

मुंबई : दिल्लीतल्या हिंसाचारावरून जोरात राजकारण रंगलं आहे. दिल्लीतल्या हिंसाचाराला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे. दिल्लीतल्या दंगलीप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. दुसरीकडे दिल्लीतील घटनेला गृहमंत्री जबाबदार आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. असा हिंसाचार म्हणजे गुप्तचर यंत्रणेचं अपयश असून पंतप्रधानांनी पारदर्शक चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. दिल्लीत सगळ्यांनीच शांतता राखायला हवी, असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलं आहे. 

दिल्ली हिंसाचारात बळींचा आकडा २० वर गेला आहे. तर जखमींची संख्या दीडशेपेक्षा जास्त आहे. दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सर्व अधिकार बहाल करण्यात आले आहेत. तसंच दिल्ली-गाजियाबाद सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

जाफराबाद आणि मौजपूरमध्ये पोलिसांनी आंदोलकांना हटवलं आहे. दिल्लीतल्या परिस्थितीमुळे सीबीएसईची परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. हिंसा थांबली असली तरी तणाव कायम आहे. काल बंद करण्यात आलेले मेट्रोचे पाच स्टेशन्स आज पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.