नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला श्रद्धांजली देण्याची प्रथा आहे. पण याऐवजी कोणी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तर ? वाचायला विचित्र वाटतंय ना ? पण हे प्रत्यक्षात घडलंय. उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातील गावात हा धक्कादायक प्रकार घडलायं. इथल्या नगरसेवकाने मृत्यू दाखला देताना त्यावर पुढील भविष्यासाठी शुभेच्छा असे त्यात लिहिले. हा मृत्यू दाखला सोशल मीडियात प्रचंड वायरल होत असून यावर चर्चा रंगत आहेत.
असोहा ब्लॉक येथील शिवारीया गावात ही घटना घडली. तिथे लक्ष्मी शंकर यांचे २२ जानेवारीला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा मृत्यू दाखल्यासाठी ग्रामसेवक बाबुलाल यांच्याकडे गेला. काही महत्वाच्या कामांसाठी त्याला त्यावेळी मृत्यू दाखल्याची गरज होती.
बाबुलाल यांनी केवळ मृत्यू दाखलाच दिला नाही तर त्यासोबत शुभेच्छा देखील दिल्या. उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा असे त्यांनी या पत्रात लिहिले.
मी यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो. असे ग्रामसेवक बाबुलाल यांनी या मृत्यू दाखल्यावर लिहिले.
हा मृत्यू दाखला सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. त्यानंतर ग्रामसेवकाने यासंदर्भात माफी देखील मागितली आणि नवा मृत्यू दाखला दिला.