नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. हा पराभव राहुल गांधी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष पदावरुन दूर होण्याचा निर्णय घेतला. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. मात्र, राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राहुल यांची बहीण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाढ्रा यांनी राहुल यांना पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्याबाबत त्यांची प्रशंसा केली. पद सोडण्याचा निर्णय हा धाडसी आहे. "आपण खूपच धैर्यवान आहात आणि आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल आदर बाळगतो."
राहुल गांधी यांनी चार पानी राजीनामा लिहून पक्षाकडे सोपवला. यामध्ये राहुल गांधी यांनी त्यांची संपूर्ण भूमिका मांडली आहे. या निर्णयाचे प्रियंका गांधी वाढ्रा यांनी समर्थन केले आहे. असा निर्णय घ्यायला धाडस लागते, असे प्रियंका यांनी ट्विट करत म्हटले आहे. तसेच माझा या निर्णयाला पाठिंबा आहे, असेही म्हटले आहे.
Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra reacts on Rahul Gandhi's decision to resign from the post of party president, tweets 'Few have the courage that you do. Deepest respect for your decision.' pic.twitter.com/BQOiyP1B55
— ANI (@ANI) July 4, 2019
मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नसून पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. मी राजीनामा दिला आहे. आता कार्यकारी समितीने नवीन अध्यक्षाची निवड करावी, असे राहुल यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पराभवाची कोणीही जबाबदारी घेतलेली नाही. त्यामुळे राहुल गांधी व्यथित झाले होते. त्यांनी ही खंत बोलून दाखवली. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आपण पक्षाचा अध्यक्ष नसल्याचे म्हटले आहे.