'फ्रीडम ऍट मिडनाइट', काँग्रेसने सोयीने उचलेला सावरकरांचा उल्लेख

सावरकरांच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचा दुटप्पीपणा पुन्हा समोर आलाय.

Updated: Jan 3, 2020, 09:05 PM IST
'फ्रीडम ऍट मिडनाइट', काँग्रेसने सोयीने उचलेला सावरकरांचा उल्लेख title=

मुंबई : सावरकरांच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचा दुटप्पीपणा पुन्हा समोर आलाय. फक्त सावरकरांचीच प्रतिमा वाईट करायची, हा काँग्रेसचा डाव असल्याचं दिसतंय. सावरकरांवर पुन्हा निशाणा साधत काँग्रेसनं वाद सुरू केलाय. मध्य प्रदेशात काँग्रेस सेवादलाच्या शिबिरात वीर सावरकर कितने वीर हे पुस्तक वाटण्यात आलं. त्यामध्ये नथूराम गोडसे आणि वीर सावरकरांचे समलैंगिक संबंध असल्याचा दावा करण्यात आलाय.

यातला सर्वाधिक धक्कादायक दावा म्हणजे सावरकरांचे नथूराम गोडसेसोबत समलैंगिक संबंध होते. सावरकर १२ वर्षांचे असताना त्यांनी मशिदीवर दगडफेक केली होती. अल्पसंख्याक समाजातल्या महिलांवर बलात्कार करण्यासाठी सावरकर अनुयायांना उकसवत असत, असंही या पुस्तिकेत म्हटलंय.

शत्रूच्या महिलांना पळवून त्यांच्यावर बलात्कार करणं हे राजकीय हत्यार असल्याचं सावरकरांचं मत होतं. याचं समर्थन करताना 'रावणानं सीतेला पळवून आणणं हा अधर्म नव्हता, तर तो परम धर्म होता', असं सावरकर सांगायचे, असं पुस्तिकेत म्हटलंय.

वीर सावरकर कितने वीर हे पुस्तक मूळ डॉमिनिक लैपिएर आणि लैरी कॉलिन यांनी लिहिलेल्या 'फ्रीडम एट मिडनाइट' या पुस्तकाच्या आधारावरुन छापण्यात आलंय. झी मीडियानं फ्रीडम ऍट मिडनाईट पुस्तक चाळलं तेव्हा लक्षात आलं की या मूळ पुस्तकात अनेक व्यक्तींबद्दल विविध दावे करण्यात आलेत.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत जवाहरलाल नेहरुंच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लिहिण्यात आलंय. चौथ्या अध्यायात महात्मा गांधींचे कामवासनेसंदर्भातले प्रयोगांचा उल्लेख आहे.

आठव्या अध्यायात मोठमोठ्या राजांच्या अय्याश आणि कामुक जीवनशैलीबद्दलचे किस्से आहेत. सहाव्या अध्यायात शेवटचे व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांची पत्नी एडविना नेहरुंसाठी कशा मॅनिप्युलेटीव्ह वागायच्या, याचं वर्णन करण्यात आलंय. यापुस्तकात मोहम्मद अली जिनांबद्दलही लिहिण्यात आलंय.

जिन्ना यांच्यामध्ये मुस्लिमांना अभिमान वाटावा, असे गुण नव्हते. जिन्ना दारु प्यायचे आणि डुकरांचं मास खायचे, ज्याला इस्लाम परवानगी देत नाही. जिन्ना दाढीही करायचे. ते कधीच मशिदीत गेले नाहीत. त्यांच्या लेखी कुराण आणि अल्लाह महत्त्वाचे नव्हते. इतकंच काय त्यांना उर्दूही बोलता येत नव्हतं.

काँग्रेसला पुस्तक छापताना फक्त सावरकरांबद्दलचाच उल्लेख का छापावासा वाटला? नेहरु, गांधी आणि जिन्ना यांच्याबद्दल मूळ पुस्तकात लिहिलेलं काँग्रेसला का समाविष्ट करावंसं वाटलं नाही. ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा जीवनपट हा बऱ्याचवेळा वादग्रस्त घटनांनी भरलेला असतो. पण त्यांच्याबद्दल लिहिताना भाषेची मर्यादा, शालीनता आणि संयम बाळगावाच लागेल.