नवरदेवच नाही! शेकडो वधूंचं स्वत:च्याच गळ्यात वरमाला घालत लग्न; UP मधला विवाहसोहळा चर्चेत

CM Mass Marriage Scheme: सोशल मीडियावर या सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून कारवाईसाठी टीमची स्थापना करण्यात आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 31, 2024, 12:49 PM IST
नवरदेवच नाही! शेकडो वधूंचं स्वत:च्याच गळ्यात वरमाला घालत लग्न; UP मधला विवाहसोहळा चर्चेत title=
उत्तर प्रदेशमधील विचित्र घटना

CM Mass Marriage Scheme: उत्तर प्रदेशमधील बलिया येथे मुख्यमंत्री सामुहिक विवाह योजनेअंतर्गत घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ठिकाणी 25 जानेवारी रोजी एकाच वेळी 568 जोडप्यांचं लग्न लावण्यात आलं होतं. मात्र यापैकी अनेक लग्नं ही नवरदेवाशिवाय लावण्यात आल्याचा मोठा खुलासा समोर आला आहे. या कार्यक्रमातील व्हिडीओही समोर आला असून त्यातही नवरदेवाशिवाय लग्न लावण्यात आल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये अनेक वधू स्वत:च्याच गळ्यात वरमाला घालताना दिसत आहेत. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नक्की घडलं काय?

मुख्यमंत्री सामुहिक विवाह योजनेअंतर्गत प्रत्येक विवाहासाठी सरकारकडून 51 हजार रुपये दिले जातात. प्रत्येक जिल्ह्यात सामुहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. याचअंतर्गत बलियामध्ये 568 विवाह आयोजित करण्यात आले होते. मात्र आता यामध्ये घोटाळा झाल्याची माहिती समोर येत आहे. सोहळ्यातील 568 पैकी शेकडो नववधू स्वत:च्याच गळ्यात वरमाला घालताना दिसत आहेत. या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या अनेक बुरखा परिधान केलेल्या महिलांनी स्वत:च्या गळ्यात हार घातले. नवरा मुलगा नसलेल्या या वधूंनी केलेल्या या अनोख्या लग्नविधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून. या व्हायरल व्हिडीओमुळे खोट्या सोहळ्याचा भांडाफोड झाला आहे.

आयोजकांचा कट

यासंदर्भात विचारपूस केली असता सदर विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या अनेक तरुणी भटकंतीसाठी आल्याचं स्पष्ट झालं. लग्नासाठी उभ्या राहा. तुम्हाला भरपूर पैसे देऊ असं आमिष दाखवून या मुलांना सोहळ्यात सहभागी करुन घेण्यात आलं. विवाहांची खोटी संख्या दाखवून सरकारकडून मिळणारं अनुदान लुबाडण्याचा आयोजकांचा कट उघडा पडला आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्रशासनाला जाग

सोशल मीडियावर या सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. या प्रकरणामध्ये बांसडीह विधानसभा मतदारसंघाच्या आमदार केतकी सिंह यांनी या प्रकरणाची दखल घेतील जाईल असं आश्वासन दिलं आहे. तसेच दोषींना सोडणार नाही असंही त्या म्हणाल्यात. अशा घोटाळ्यांच्या माध्यमातून गरिबांची फसवणूक केली जाते, असंही महिला आमदाराने म्हटलं आहे. या प्रकरणाच्या तपासाठी जिल्हा स्तरावर 20 जणांच्या एका टीमची स्थापना केली आहे. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

20 पैकी 8 विवाह खोटे

मुख्य विकास अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये मुख्यमंत्री सामुहिक विवाह योजनेअंतर्ग देण्यात येणारा निधी तातडीने थांबवण्यात आल्याचं सांगितलं आहे. आतापर्यंत झालेल्या 20 विवाहांच्या चाचपणीपैकी 8 विवाह खोटे निघाले आहेत.