पुलाच्या उदघाटनादरम्यान खासदार मनोज तिवारी आणि आप कार्यकर्ते भिडले

मनोज तिवारी यांचा पोलीस आणि आपवर आरोप

Updated: Nov 4, 2018, 06:29 PM IST
पुलाच्या उदघाटनादरम्यान खासदार मनोज तिवारी आणि आप कार्यकर्ते भिडले title=

नवी दिल्ली : एका पूलाच्या उद्घाटनासाठी दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी पोहचल्याने एकच राडा झाला. कार्यक्रमादरम्यानच भाजप आणि आपचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यावेळी मनोज तिवारी यांना आपच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतल्याने अनुचित प्रकार घडला नाही. मी उत्तर दिल्लीचा खासदार असल्याने या पुलाच्या उद्घाटनासाठी आल्याचं मनोज तिवारी यांनी म्हटलं. यावेळी त्यांना आपच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांनी केलाय.

आपल्याला या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वागतासाठी थांबलो असताना अचानक आपच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी केला आहे.

मनोज तिवारी हे व्हीआयपी असल्यासारखे वावरत होते. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आपच्या दिलीप पांडे यांनी केला आहे.