मुंबई : २५ डिसेंबर म्हणजे ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा जल्लोष सगळीकडे बघायला मिळतोय. जगभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसा हा उत्सव ख्रिश्चन लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
ण तसा या उत्सवात सर्वच धर्माचे लोक आता सहभागी होताना दिसतात. असे मानले जाते की, येशू ख्रिस्त यांनी या दिवशी जन्म घेतला होता. या उत्सवाच्या दिवशी शुभेच्छांसोबतच ऎकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात.
बायबलनुसार येशू ख्रिस्तांचा जन्म जुदेआच्या बेथलेहॅम या जागी एका गोठ्यात झाला. संत लुकच्या लेखनातून येशूची आई मारिया आणि वडील योसेफ यांच्या दृष्टिकोनातून बेथलेहॅमच्या यात्रेचा वृत्तांत दिलेला आहे. असे मानले जाते की, या दिवशी देवदूताने त्यांना मसिया म्हणून उद्देशिले व आजू-बाजूचे सर्व मेंढपाळ त्याची स्तुती करत होते. तसेच संत मॅथ्यु यांच्या सुचनानुसार तीन राजे येशूंना भेटायला आले होते. त्याच लोकांनी येशूला भेटवस्तू दिल्या. येशूंच्या जन्माचा संदेश मिळताच त्यावेळच्या राजा हेरॉडने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. त्यामुळे येशूंचे कुटुंबीय ईजिप्तला गेले.
रोमन कालगणनेनुसार २५ डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळाचा दिवस आहे. प्रतीकात्मक कारणासाठी भगवान येशू यांनी आपल्या जन्मासाठी हा सर्वात छोटा दिवस निवडला अशी धारणा आहे. प्राचीन धर्मोपदेशक ऑगस्टाईन यांनी नोंदविले आहे की आपल्या पृथ्वीय अनुमानानुसार भगवान येशू सर्वात छोट्या दिवशी जन्माला आले. तरीही त्यामागील उदात्त आशय असा आहे की त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो. त्यामुळे भगवान येशू आपल्यासाठी लीन झाले आणि त्यांनी आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला दाखविला. कारण यानंतरच्या दिवसांमध्ये सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो.
या जन्माच्या स्मरणाचे औचित्य साधून चर्चमध्ये सायंकाळपासून प्रार्थना म्हणण्यात येतात.ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेस आवर्जून उपस्थित राहतात. काही ठिकाणी नाताळ सणापूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जावून येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. यांना केरॉल असे म्हणतात.
इसा मसीह यांच जन्म ४ ते ६ इ.स.पूर्वाच्या आसपासचा मानला जातो. ख्रिसमस डे कधीपासून साजरा केला जातो याबाबत कोणतेही ठोस पुरावे नाहीयेत. पण असे मानले जाते की, इ.स.३६६ मध्ये रोममध्ये पहिला ख्रिसमस डे साजरा केला गेला.
तुम्ही ख्रिसमसला लाल टोपी, लाल कपडे, पाठीवर झोळी घेतलेला आणि पांढरी दाढी-मिशी असलेला एक म्हातारा पाहिला असेल. आपण सर्वजण या व्यक्तीला सांताक्लॉज नावाने ओळखतो. वास्तविक पाहता सांताला पाश्चिमात्य संस्कृतीत मानवता आणि प्रेमाचा संदेश देणा-या देवाचा दूत मानलं गेलं आहे. त्यांना सेंट निकोलस आणि फादर ख्रिसमसच्या नावानेही ओळखले जाते.