नवी दिल्ली : गेल्या आर्थिक वर्षात देशभरातल्या बँकांची सुमारे 17 हजार कोटींची फसवणूक झाल्याची माहिती अर्थमंत्रालयाने लोकसभेत दिली आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
गेल्या आर्थिक वर्षांत बँकांवर दरोडा पडण्याच्या, चोरी होण्याच्या घटना देशभरात घडल्यात. अशा घटनांमध्ये एकूण 65.3 कोटी रुपये लुटून नेण्यात आलेत. चालू आर्थिक वर्षात अशा 393 घटना घडल्या असून 18.48 कोटी रुपये लुटून नेण्यात आलेत. रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी सर्व बँकांना त्यांच्या शाखा आणि एटीएमच्या सुरक्षा उपाययोजना वाढवण्याच्या सूचना केल्यात अशी माहिती शुक्ला यांनी दिलीय. बँकाची फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सायबर सुरक्षेवर स्थायी समिती नेमलीय. यात सायबर सुरक्षा तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, आणि माहिती सुरक्षा तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती सध्या वाढलेल्या तंत्रय़ज्ञानाच्या वापरामुळे निर्माण होणा-या धोक्यांचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना सुचवणार आहे.
दरम्यान, नोटाबंदीनंतर नव्याने चलनात आलेली दोन हजार रुपयाची नोट बंद होणार ही निव्वळ अफवा असून त्यावर विश्वास ठेऊ नका असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलंय. गेल्या काही दिवसांपासून ही नोट बंद होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत जेटलींनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय.