मुंबई : चीनच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधला आहे. या परिस्थितीमध्ये एकत्र येण्यापेक्षा राजकीय चिखलफेक सुरू असल्यामुळे आपलं जगात हसं होत आहे, असं मिलिंद देवरा म्हणाले आहेत.
'चीनच्या अतिक्रमणाविरोधात आपण एका सूरात बोललं पाहिजे, पण त्याऐवजी राजकीय चिखलफेक होत आहे. जगाला आपण एक नसल्याचं दाखवत आहोत,' असं ट्विट मिलिंद देवरा यांनी केलं आहे.
It’s highly unfortunate that the national discourse surrounding the surge in Chinese transgressions has deteriorated into political mud-slinging.
When we should be united in condemning China’s actions & seeking solutions, we are exposing our divisions
— Milind Deora मिलिंद देवरा (@milinddeora) June 27, 2020
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चीनच्या प्रश्नावर काँग्रेसवर निशाणा साधला होता. राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर राजकारण करु नये, असं शरद पवार म्हणाले होते.
'१९६२ साली काय झालं होतं, हे विसरून चालणार नाही. चीनने आपल्या ४५ हजार वर्ग किमी जमिनीवर अतिक्रमण केलं. सध्या चीनने भारताच्या कोणत्या भूभागावर कब्जा केलाय, याची माहिती मला नाही. पण यावर चर्चा करत असताना आपल्याला इतिहासात काय झालं, याचीही आठवण ठेवावी लागेल,' असं शरद पवार म्हणाले.
तसंच गलवान खोऱ्यामध्ये झालेली चकमक हे संरक्षण मंत्र्यांचं अपयश नाही, कारण गस्त घालताना भारतीय सैनिक सतर्क होते. चीनचं हे प्रकरण संवेदनशील आहे. गलवान खोऱ्यात भारत रस्ते बांधत होता. चीनने आपल्या रस्त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि धक्बाबुक्की केली. हे कोणाचंच अपयश नाही. गस्त घालताना जर कोणी तुमच्या भागात येत असेल, तर ते दिल्लीत बसलेल्या संरक्षण मंत्र्यांचं अपयश असल्याचं आपण म्हणू शकत नाही, अशी प्रतिक्रियाही शरद पवारांनी दिली.
'तिकडे गस्त होती. त्याठिकाणी धक्काबुक्की झाली म्हणजे, आपलं सैन्य सतर्क होतं. जर तुम्ही तिकडे नसतात, तर चीनी सैनिक कधी आले आणि कधी गेले? हे कळलंही नसतं. त्यामुळे यावेळी असे आरोप करणं योग्य नसल्याचं मला वाटतं', असं वक्तव्य पवारांनी केलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. नरेंद्र मोदींनी भारताचा भूभाग चीनला देऊन टाकल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.