जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे, काश्मीरमधील वातावरण दूषित करण्यामागे चीनचा हात आहे.
काश्मीरची समस्या कायदा-सुव्यवस्थेची नाही. आपण परकीय शक्तींशी लढत आहोत. परिणामी काश्मीरमधलं वातावरण दिवसेंदिवस दूषित होत आहे. आधी याला पाकिस्तान कारणीभूत होतं, मात्र आता यामागे चीनचा हात असल्याची माहिती आहे, असं मुफ्ती म्हणाल्या
मेहबूबा मुफ्ती यांनी दिल्लीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत केलेल्या चर्चेनंतर हा दावा केला.
‘काश्मीर एकटा या आक्रमणांना तोंड देऊ शकत नाही, संपूर्ण देशाचा पाठिंबा आवश्यक आहे. सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे’ असं आवाहनही मुफ्ती यांनी केली.
भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले असतानाच काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे.
काश्मीरमध्ये मागील काही दिवसात पोलिस, जवान, अमरनाथच्या यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ले झाले. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यात सात जणांना प्राण गमवावे लागले होते. या पार्श्वभूमीवरच मुफ्ती यांनी जवळपास तासभर राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली.