Chief Justice Blasts Lawyer: देशाचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी एका वकिलाला आज सर्वोच्च न्यायालयामध्ये चांगलेच फैलावर घेतलं. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठासमोर युक्तीवाद करताना या वकिलाने कोर्ट मास्टर (नोंद ठेवणारा व्यक्ती) न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा तपशीलाची फेरतपासणी केल्याचा दावा केला. हे ऐकल्यानंतर सरन्यायाधीश चांगलेच संतापले. "मी कोर्टामध्ये काय म्हणालो हे तुम्ही कोर्ट मास्टर्सला विचारण्याची हिंमत कशी केली?" असा सवाल या वकिलाला विचारला.
सरन्यायाधीशांनी अजूनही मी इथला प्रमुख आहे, अशी आठवण करुन दिली. "कमी वेळेसाठी का असेना," मी इथला प्रमुख आहे, असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. "पुन्हा या गोष्टी करण्याचा कधी प्रयत्न करु नका, माझे कोर्टातील काही शेवटचे दिवस शिल्लक आहेत," असं सरन्यायाधीस म्हणाले. तसेच सरन्यायाधीश म्हणून दिलेल्या निकालाचा तपशील परस्पर जाऊन कोर्ट मास्टरकडून मिळवणाऱ्या वकिलाचं वागणं योग्य नसल्याचं चंद्रचूड यांनी म्हटलं. अशाप्रकारे माहिती मिळवणं चुकीचं असल्याचं सांगताना संतापून चंद्रचूड यांनी या वकिलाला, "उद्या तुम्ही माझ्या घरी येऊन माझ्या खासगी सचिवांना मी काय करतोय हे विचाराल. वकिलांनी सर्व तर्कबुद्धी गमावली आहे की काय?" असा संतप्त सवाल विचारला.
न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशासंदर्भातील सुनावणीदरम्यान ही शाब्दिक देवाण-घेवाण झाली. सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. चंद्रचूड यांच्यानंतर न्यायाधीश संजीव खन्ना सरन्यायाधीश होतील असं सांगितलं जात आहे.
सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांच्या कार्यकाळामध्ये चंद्रचूड यांनी कोर्टातील कार्यपद्धती आणि नियमांची अंमलबजावणी होईल याची काळजी घेतली. अनेकदा त्यांनी न्यायालयीन कार्यपद्धती डावलणाऱ्या वकिलांना फैलावर घेतलं आहे. बऱ्याचदा त्यांनी चुकीच्या वर्तवणुकीसाठी वकिलांना सुनावलंही आहे.
नक्की वाचा >> सद्गुरुंना मोठा दिलासा! 150 पोलिसांच्या छापेमारीनंतर CJI चंद्रचूड म्हणाले, 'अशा संस्थांमध्ये...'
मागील आठवड्यामध्ये सरन्यायाधीशांनी एका वकिलाला सुनावणीदरम्यान अगदी कॅज्युअली 'या' असा उच्चर केल्यावर झापलं होतं. "हे काही कॉफीचं दुकान नाही. हे या या काय सुरु आहे? मला अशा या या ची एलर्जी आहे. हे असं इथं चालणार नाही," असं सरन्यायाधीश म्हणाले होते.
याच वर्षी इलेक्टोरिअल बॉण्डसंदर्भातील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी एका वकिलाने युक्तिवाद करताना आवाज वाढवल्याच्या मुद्द्यावरुन थेट नाराजी व्यक्त केलेली. खंडपिठासमोर बोलताना या वकिलाने आवाज वाढवत आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला असता सरन्यायाधीशांनी, "माझ्यावर ओरडायचं नाही. ही काही बागेतील कोपऱ्यामधील मिटींग नाही, तुम्ही न्यायालयात आहात. तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करा. मी सरन्यायाधीस म्हणून माझा निकाल दिला आहे. आम्ही आता तुमचं काही ऐकून घेणार नाही. तुम्हाला पुन्हा याचिका करायची असेल तर ईमेलवरुन करा. हा न्यायालयाचा नियम आहे," असं सरन्यायाधीशांनी संतापून म्हटलेलं.