भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांचे भाजपसाठी महत्त्वाचे वक्तव्य

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी सप आणि बसप आघाडीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

Updated: Jan 14, 2019, 01:25 PM IST
भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांचे भाजपसाठी महत्त्वाचे वक्तव्य title=

सहारणपूर - भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी सप आणि बसप आघाडीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेशात या दोन्ही पक्षांनी आघाडी केल्यामुळे आता भाजपने एखाद्या दलित व्यक्तीला उमेदवारी दिली, तरी त्यांना मत देऊ नका, असा सल्ला चंद्रशेखर आझाद यांनी रविवारी एका कार्यक्रमात उपस्थितांना दिला. भाजपला हरवण्यासाठी भीम आर्मी सप आणि बसप आघाडीला पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. उत्तर प्रदेशात भाजपला हरवण्यासाठी एक राजकीय-सामाजिक आघाडी व्हावी, अशी माझी इच्छा होती. माझे हे स्वप्न सप आणि बसप यांच्यातील आघाडीमुळे पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले. 

चंद्रशेखर आझाद सहारणपूरमधील रविदास छात्रावासमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सप-बसप आघाडीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. गेल्याच शनिवारी उत्तर प्रदेशात एका पत्रकार परिषदेत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची आघाडी झाल्याचे औपचारिकपणे जाहीर केले. उत्तर प्रदेशात हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्या आघाडीमध्ये काँग्रेसला सहभागी करून घेण्यात आलेले नाही. दोन्ही पक्ष उत्तर प्रदेशातील किती जागांवर निवडणूक लढविणार हे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. तरीही दोन्ही पक्ष ३८-३८  अशा समसमान जागांवर उमेदवार उभे करतील, असे समजते.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अखिलेश यादव आणि मायावती उत्तर प्रदेशातील मुख्य शहरांमध्ये एकत्रितपणे प्रचारसभा घेणार आहेत. याची सुरुवात लखनऊमधून होणार आहे. त्याचबरोबर गोरखपूर, वाराणसी आणि प्रयागराजमध्येही जाहीर सभा होतील. या आघाडीने राष्ट्रीय लोकदलासाठी दोन जागा सोडल्या आहेत. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याही पारंपरिक मतदारसंघात या आघाडीकडून उमेदवार उभे करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.