केंद्रीय मंत्रीपदाच्या लॉटरीनंतर भागवत कराड यांची पंकजा मुंडेंविषयी पहिली प्रतिक्रिया

नाराज असलेल्या पंकजा मुंडे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना भेटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं

Updated: Jul 12, 2021, 08:51 PM IST
केंद्रीय मंत्रीपदाच्या लॉटरीनंतर भागवत कराड यांची पंकजा मुंडेंविषयी पहिली प्रतिक्रिया title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : केंद्रातील टीम 'नरेंद्र' मध्ये खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्री बनवण्यात आलं. त्यामुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यात, दोन दिवस प्रतिक्रिया न दिल्याने, नाराजीच्या चर्चेला अधिक बळ मिळालं.

नाराज असलेल्या पंकजा मुंडे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना भेटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज भागवत कराड यांनी दिल्लीत पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दोघांनीही तासभर गप्पा मारल्या. यावेळी भागवत कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.  भागवत कराड ट्विट करत या भेटीची माहिती दिली. 

गोपीनाथ मुंडे माझे नेते होते, आज ताई आहेत... त्यांनीही साहेबांच्याप्रमाणे शुभेच्छा दिल्या. असं भागवत कराड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज?

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, ती चर्चा फोल ठरली. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं डॉ. भागवत कराड यांना संधी दिली. या सर्व घडामोडींमुळं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून यावर थेट भाष्य करण्यात आलं होतं. पंकजा मुंडे यांना संपवण्यासाठी वंजारी समाजातून भागवत कराड यांना मंत्रिपद दिलं गेलं आहे, अशी शंका शिवसेनेनं उपस्थित केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. 

पंकजा किंवा प्रीतम मुंडे म्हणजे वंजारी समाज नाही. वंजारी समाजातून कोणीही नेता मोठा होत असेल तर त्याला आमचा पाठिंबाच आहे. शिवाय, मंत्रिपद मिळालेले हे मुंडे साहेबांनी घडवलेलेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळं त्यांचा आम्हाला अभिमानच आहे,' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.