Camel Killed Owner Shocking Incident In Bikaner: कधीतरी घरातील पाळीव प्राणीच (Pet Animal) हिंसक होतात आणि आपल्या मालकावर हल्ला करतात. अनेकदा पाळीव कुत्र्याने घेतलेला चावा, महुताला हत्तीने पाया खाली चिरडून मारल्याचा बातम्या तुम्ही वाचल्या असतील. मात्र एका ऊंटाने त्याच्या मालकाचा जीव घेतला (Camel Killed Owner) असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण राजस्थानमधील बीकानेर (Bikaner) जिल्ह्यात खरोखरच अशी धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका ऊंटाने आपल्या मालकाला चावा घेत त्याला जमीनीवर आपटलं. त्यानंतर या ऊंटाने पायाखाली मालकाला चिरडलं. त्यानंतर हा ऊंट या व्यक्तीच्या अंगावर बसला. या हल्ल्यामध्ये ऊंटाच्या मालकाचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची बातमी गावात पसरल्यानंतर गावकऱ्यांनी काठी, लाठ्यांनी मारहाण करुन या ऊंटाचाही जीव घेतला.
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना बीकानेरमधील पांचू येथे घडली. पांचू पोलीस स्टेशनचे अधिकारी मनोज यादव यांनी या हल्ल्यात स्थानिक रहिवाशी असलेल्या सोहनराम नायकचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. सोहनराम सोमवारी सायंकाळी पाच वाजता आपल्या शेतामध्ये काम करत होता. त्यावेळी त्याच्या ऊंटाला खुंटीने बांधण्यात आलं होतं. त्याचवेळी तेथे अन्य एक ऊंट आला. त्यावेळी सोहनरामचा ऊंट दोर तोडून त्या ऊंटामागे धावला.
आपला ऊंट दोर तोडून पळून गेल्याचं पाहून सोहनराम ऊंटाला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावला. सोहनरामने ऊंटाला बांधणारा दोर पकडून त्याला थांबवलं. मात्र दुसऱ्या ऊंटाचा पाठलाग करतानाच मालकाने रोखल्याने हा ऊंट चांगलाच संतापला. त्याने सोहनरामचा चावा घेतला. सोहनराम अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गोंधळून गेला आणि वेदनेनं विव्हळला. मात्र ऊंट त्याच्यावर हल्ला करत राहिला. ऊंटाने सोहनरामला धक्का देत खाली पाडलं आणि त्याला पायाखाली तुडवलं. त्यानंतर ऊंट जखमी सोहनरामच्या अंगावर बसला. यावेळेस आजूबाजूला कोणीच नव्हतं. जबर जखमी झालेल्या सोहनरामचा या हल्ल्यात झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाला.
गावकऱ्यांना या हल्ल्याबद्दलची माहिती मिळाली तेव्हा ते सोहनरामच्या शेतात पोहोचले. सोहनरामच्या मृत्यूमुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी सोहनरामच्या ऊंटावर लाठी-काठ्यांनी हल्ला केला. यातच या ऊंटाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सोहनरामच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या हाती सोपवला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्यामध्ये ऊंटांच्या तोंडाला फेस सुटतो. स्थानिक भाषेत याला 'झूठ' असं म्हणतात. अशावेळी ऊंट फारच संतापलेला असतो. अशावेळी ऊंटाला काळजीपूर्वी हातळणं आवश्यक असतं नाहीतरी तो हल्ला करु शकतो.