नवी दिल्ली : राजधानीत सीएएविरोधी (CAA Protest) सुरू असलेल्या आंदोलनात आत्तापर्यंत १० जणांचे बळी गेले आहेत. दिल्लीत शांतता प्रस्थापीत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत दिल्लीतील सुरक्षेत वाढ करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे ठरवण्यात आले. दरम्यान परिसरात शांतता निर्माण करण्यासाठी अमन समितीसह चर्चा करण्यात आली.
सुरक्षेसाठी निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. ब्रम्हपुरी, घोडा, चांद बाग, करावल नगर, भजनपुरामध्ये तणावाची स्थिती आहे. क्राईम ब्रांच, स्पेशल सेल, स्थानिक पोलिस तैनात आहेत. उत्तर पूर्व दिल्लीतील सर्व शाळा उद्या देखील बंद राहतील, असे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी स्पष्ट केले आहे.
तर सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी विनंती दिल्ली सरकारने केली आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आज रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच तणावग्रस्त भागात शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी आंदोलकांना केले आहे. या हिंसाचारात हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्माचे लोकं जखमी झालेत त्यामुळे ही हिंसा कशासाठी, असा सवाल उपस्थीत केला आहे.
दरम्यान, ईशान्य दिल्लीत सोमवारी उसळलेल्या हिंसाचारामध्ये दिल्ली पोलिसांचे हेडकॉन्स्टेबल रतन लाल हे शहीद झाले होते. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नायाब राज्यपाल अनिल बैजाल आणि पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक हे देखील उपस्थीत होते.. हेडकॉन्स्टेबल रतन लाल यांनी देशासाठी आपले बलिदान दिले आहे. त्यांच्या हौतात्म्याचा दिल्ली पोलिसांना अभिमान असून दिल्ली पोलीस त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत अशी प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली.